सावित्री पात्रातील गाळ बळीराजाच्या मुळावर!

By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: सन 2021 च्या महापुरानंतर महाड तालुक्यात सावित्री नदीपात्रात व तालुक्यातील अन्याय नद्यांमध्ये गाळ (excavation of sludge from Savitri river) काढण्याच्या कामाला वेग आला. मात्र, काढलेला गाळ टाकण्याबाबत तहसीलदार सुरेश काशीद व महाड उपविभागीय दंडाधिकारी प्रांत प्रतिमा पुदलवाड यांच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे नदीपात्रातून काढलेला गाळ बळीराजाच्या मुळावर आला आहे. महाड जवळील केभुर्ली येथील हजारो एकर भात शेती या गाळामुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सावित्री नदीपात्रात गाळ काढण्याचे काम मागील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर चालू आहे. नदीपात्रातील काढलेला गाळ कोणत्या ठिकाणी टाकावा याचे पाटबंधारे खाते व महसूल खाते यांनी योग्य प्रकारे नियोजन न केल्याने त्याचा फटका अनेक गावातील नागरिकांना येत्या पावसाळ्यात बसणार आहे. महाड जवळील केभुर्ली गावाच्या नजीक असणाऱ्या सावित्री नदीपात्रात सीआरझेड नियमाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे रेतीचा उपसा करण्याचे काम ठेकेदारांनी तहसीलदार सुरेश काशीद व प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या आशीर्वादाने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

केभुर्ली गावाच्या हद्दीत सावित्री नदीपात्रातून काढलेला गाळ काढून त्याचे भले मोठे डोंगर रचण्याचे काम ठेकेदारांनी केल्याने यंदाच्या पावसाळ्यात हा गाळ शेतामध्ये जाऊन या गावातील हजारो एकर भात शेती नापीक होणार आहे. याबाबत याच गावातील ग्रामपंचायत सदस्य जाकीर घोले यांनी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद व प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना लेखी निवेदन दिले. तरीही विनापरवाना गाळाचे डोंगर उभे करणाऱ्या ठेकेदारांना या अधिकाऱ्यानी अभय दिल्याचा आरोप घोले यांनी केला आहे.

केभुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत पणे सावित्री पात्रातील नदीतून काढून साठवलेला गाळ ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी महसूल विभाग व पाटबंधारे विभागाने न घेता ग्रामस्थांच्या हजारो एकर भात शेतीवर संकट उडवण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केल्याने या गावातील ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

येत्या पावसाळ्यात पुराचे पाणी (flood) तर येईलच, परंतु या पाण्याबरोबर साठवलेला गाळ देखील भात शेतीमध्ये जाऊन या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकी होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

केभुर्ली गावातील सावित्री नदीपात्रातून काढलेला व अनधिकृतपणे साठवलेला गाळ तातडीने न काढल्यास शेतकरी व गावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने प्रशासनाने याबाबत ठोस पावले लवकर उचलण्याची मागणी या गावातील ग्रामपंचायत सदस्य जाकीर घोले यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here