Twitter : @maharashtracity

मुंबई

राज्य सरकारच्या जे जे समुह रुग्णालयात मंगळवारी सीव्हीटीएस युनिट सुरु करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर, आमदार आमीन पटेल, यामिनी जाधव तसेच जेजे रुग्णालय अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, दिपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन फंडातून ५ कोटी फंडदिल्याने हा सीव्हीटीएस युनिट सुरू करण्यात आला आहे. या वर्षीही ५ कोटी फंड देण्याचे ठरवल असून याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आणखी निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळी सतत निधीची गरज लागते. तो कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

या ठिकाणी १३०० बेडसह आयसीयू बेड देखील आहेत. मात्र आयसीयूची मागणी सतत वाढत असून काही प्रकल्प रखडले आहेत. हे प्रलंबित प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. जे जे रुग्णालय ५१ एकरात वसलेले असून १३५२ खाटा तसेच विविध शस्त्रक्रिया या रुग्णालयात होत असतात. सरकारी रुग्णालयात सामान्य तसेच गरजू नागरिक येतात. या सर्वांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे ही ते म्हणाले.

म्हणून लाखों लोकांवर मोफत उपचार

मुश्रीफ म्हणाले की, ते १९९९ पासून मंत्री असून दोन – दोन वेळा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आपण या खात्याचा मंत्री असताना मुंबईतील अनेक रुग्णालयाना भेटी दिल्या असल्याचे सांगत ते म्हणाले, त्यावेळी कोणीही रुग्णावर मोफत उपचार करत नव्हते. मात्र आपण एक कायदा आणला. या कायद्याविरोधात तसेच माझ्याविरोधात मोहिम काढण्यात आली. अनेक अडचणी आल्या, पण मी मागे हटलो नाही. तेव्हा कुठे रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहे याचे फलक लागले. हे त्या माझ्या मेहनतीचे फलक असल्याचे मुश्रीफ म्हणाले. आपण कायदा बदलल्याने लाखो लोकांवर मोफत उपचार होत आहे. जो कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तुर्तास अनेक खासगी दवाखाने रुग्णांकडून पैसे उकळतात. याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांशी चर्चा करणार असून हृदयात टाकले जाणारे स्टेन हे लोकल आणि विदेशी असे सांगून पैसे उकळले जात आहेत. हे तातडीने बंद करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here