मुंबई कमाल तापमान ३८.८ डिग्री सेल्सिअस

अवकाळीचे वातावरण अक्षय्यतृतीयेपासुन निवळणार

मुंबई: राज्यातील कमाल तापमान चाळीशी पार गेले असताना मुंबईतील कमाल तापमान चाळीशीच्या जवळ येऊन ठेपले आहे. बुधवारी मुंबई उपनगरातील कमाल तापमान ३८.८ डिग्री
सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर कुलाबा येथील कमाल तापमान ३४.६ डिग्री सेल्सिअसवर नोंदविण्यात आले होते. आर्द्रता टक्केवारी खाली उतरल्याने उष्म्याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, मुंबईसह कोकण पट्टयात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबईतील वातावरणातील उष्मा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी घराबाहेर येण्याचे टाळले. तर काही नागरिकांनी सकाळच्या वेळेत बाहेरील काम आटपण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. आजच्या तापमानामुळे अंगाची काहिली झाल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवले. यातून पालिकेकडून उष्माघाताची काळजी घेण्याचे मार्गदर्शक नियम प्रसारीत करण्यात आले. तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दुपारच्या वेळेत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यात उष्णतेची लाटेची शक्यता :

मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग वगळता तीन जिल्ह्यात मात्र बुधवारपासूनच तेथील अवकाळी वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता आहे. मात्र सिंधुदुर्गात अवकाळी वातावरण टिकून राहण्याची शक्यता आहे.

अवकाळीचे वातावरण अक्षय्यतृतीयेपासुन निवळणार :

विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील दहा व मराठवाड्यातील आठ अशा एकूण १८ जिल्ह्यात शनिवार दि.२२ एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेपासुनच अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आह. तसेच तीन दिवसात तीव्रता कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र खान्देश व दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जामोद, एदलाबाद तसेच भुदरगड, शिरोळ, अक्कोलकोट, उमरगा, निलंगा, देवनी, किनवट, हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, देगलूर या भागात मात्र कदाचित अक्षय्यतृतीयेनंतरही अवकाळी वातावरणाचा परिणाम टिकून असण्याची शक्यता वर्तविली आहे.

मराठवाड्यात बुधवार, गुरुवारी गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण विदर्भात अवकाळी वातावरण गुरुवारपासून पुन्हा डोकावणार असुन त्यापुढील ५ ते ७ दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते. उद्या व परवा तेथे गारपीटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचेही खुळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here