@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाला (BEST) कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामधून बाहेर काढून नफ्यात आणण्यासाठी परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी, अशी सूचना पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी केली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या सन २०२२ – २३ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला (Budget) बेस्ट समितीकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा अर्थसंकल्प आता पालिका स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावरील चर्चेला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भाषणाने सुरुवात झाली.

बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात सुरू आहे. या उपक्रमाला तोट्यामधून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत देऊन सहकार्य करीत आहे. तरीही बेस्ट उपक्रम तोट्यात सुरू आहे.

त्यामुळे बेस्ट उपक्रम तोट्यात येण्यामागे कोणकोणती कारणे आहे, कोणत्या त्रुटी आहेत अथवा कोणत्या चुका होत आहेत, बेस्टला नफ्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याबाबतचा सखोल आढावा घेण्यासाठी परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती (Expert Committee) नेमण्याची सूचना पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.

भविष्यात खाजगी इलेक्ट्रीक वाहनांचा (e-vehicle) वाढता वापर पाहता बेस्ट प्रशासनाने मोकळ्या व विनावापर पडून असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या भूखंडावर इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स (electric charging stations) उभारावीत व त्या माध्यमातून महसूल वाढीसाठी प्रयत्न करावा.

बेस्ट उपक्रमाने उत्पन्न वाढीसाठी मोकळ्या भूखंडांचा व्यावसायिक तत्त्वावर (commercial use of vacant plots) वापर करण्याकरिता प्रयत्न करावा. बेस्टचे तोट्यात चालणारे बसमार्ग नफ्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. बेस्टने बस स्थानकांच्या मोकळ्या जागेचा वापर खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी (Parking) करावा. त्यामुळे बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी निश्चित हातभार लागेल.

त्याचप्रमाणे, बेस्ट परिवहन विभागाच्या बसगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे बेस्टला तोटा सहन करावा लागत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करून दंडात्मक कारवाईत वाढ करावी. त्यासाठी तिकीट तपासनीसांची संख्या वाढवावी, अशा काही सूचना त्यांनी बेस्ट उपक्रमाला केल्या आहेत.

बसवाहकांना तिकिट वाटपासाठी दिलेल्या ५० टक्के मशीन्स नादुरुस्त असून या गंभीर बाबीकडे बेस्ट प्रशासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे व ही समस्या मार्गी लावावी. बेस्ट उपक्रमाने विना वापर पडून असलेल्या जागा, मालमत्ता यांचा योग्य वापर करून त्याद्वारे उत्पन्न मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.

त्याचप्रमाणे, बिल्डरांकडील (Builder) कोट्यावधी रुपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी आणि आवश्यकता भासेल तेथे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना यशवंत जाधव यांनी बेस्ट प्रशासनाला केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here