Twitter : @maharashtracity

अलिबाग: रायगडावर दि.2 जून रोजी तिथीप्रमाणे आयोजित 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी साकारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य अशा शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र आम्हाला या 50 कोटी रुपयांऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या, आपण हे किल्ले रायगड मॉडेल करून दाखवू,असे आवाहन छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी आज किल्ले रायगड येथे केले.

लाखो शिवभक्तांच्या साक्षीने रायगड किल्ल्यावर आज 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजसदरेवर युवराज्ञी संयोगिताराजे, युवराज शहाजी महाराज, आमदार मंगेश चव्हाण, रोहित पवार, अनिकेत तटकरे, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, स्नेहल जगताप, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

छत्रपती युवराज संभाजी राजे पुढे म्हणाले की, रायगडावर आलेले मावळे हीच आपली प्रेरणा आहे. या मावळ्यांमुळेच आम्हाला ताकद मिळते. या मावळ्यांनी आता उज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरिता पुढे यायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे यातूनच आपले जीवन सार्थक होईल.

पहाटेचे धुके, मंगलमय सूर, ढोल-ताशांचा गजर, धनगरी ओव्या, पोवाडे, आणि बेल भंडाऱ्याची उधळण अशा जल्लोषात आज तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण रायगड किल्ला आणि परिसर दुमदुमून गेला होता. किल्ल्यावरील राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशा सर्वच ठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त, पारंपरिक मर्दानी खेळ, लोककलांचे सादरीकरण, पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाले होते.

पालखी आणि छत्रपती युवराज संभाजीराजे, युवराज शहाजीराजे यांच्या आगमनाने शिवभक्तांनी जय भवानी, जय शिवाजी चा एकच जयघोष केला. राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी विधीवत अभिषेक केला. यानंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास 350 सूवर्ण होणांनी अभिषेक करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्यात आली. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली.

किल्ले रायगडावर कधी नव्हे ती “न भूतो न भविष्यती” अशी गर्दी जमली होती. हा सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या सहकार्याने शिवभक्तांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, मंडप, सजावट, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, अग्निशमन सुरक्षा, पार्किंग, पार्किंग ते गड पायथा मोफत बस सेवा, भोजन व्यवस्था अशा विविध बाबींचा समावेश होता. आलेल्या शिवभक्तांनी रायगड जिल्हा प्रशासन व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांनी उपलब्ध करून दिलेल्या या सोयीसुविधांबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here