By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील मोहनराव पाटील यांचा भाजपा प्रवेशानंतर रायगड लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने नव्या नेतृत्वाला उभारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण रायगड जो महाड, श्रीवर्धन, अलिबाग व पेण मतदार संघातील काही भाग रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो, त्याची धुरा धैर्यशील पाटील यांच्या खांद्यावर टाकून लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग भाजप फुंकणार आहे. 

पेण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा शेकापच्या तिकिटावर निवडून गेलेले धैर्यशील पाटील यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे रवीशेठ पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवामुळे धैर्यशील पाटील काही काळ अज्ञातवासात गेले होते. या काळात शेकाप पक्षाच्या कार्यक्रमाला देखील त्यांनी जाणे टाळले होते. मात्र, पक्ष बदलल्याशिवाय आपली राजकीय कारकीर्द टिकणार नाही, याची जाणीव त्यांना आल्याने मार्च महिन्यातच त्यांनी शेकापला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. 

शेकाप व काँग्रेसची वाताहत

रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री मोहनराव पाटील यांच्यानंतर शेकापची धुरा खऱ्या अर्थाने धैर्यशील पाटील यांनी सांभाळली होती. मात्र शेकापच्या अलिबागच्या नेतृत्वाने धैर्यशील पाटील यांना म्हणावी साथ दिली नाही. त्यातच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी शेकापला रामराम केला. पेण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार रवी शेठ पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला व आमदार म्हणून ते या मतदारसंघातून निवडून आले.  आता धैर्यशील पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे पेणमधील काँग्रेस व व शेकाप या दोन पक्षांची पूर्णपणे वाताहत झाल्याचे बोलले जात आहे. 

शेकापची वाटचाल बिकट

रायगड जिल्ह्यात एकेकाळी अलिबाग, पेण, पनवेल व उरण या चार विधानसभा मतदारसंघात शेकापचे आमदार होते.  त्यांच्या बळावर रायगड जिल्हा परिषद शेकापने आजपर्यंत ताब्यात ठेवली. रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांचे पुत्र व पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापला रामराम केल्यानंतर खऱ्या अर्थाने रायगडात शेकापला उतरती कळा लागली.  त्यानंतर उरणचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यामध्ये अटक झाली.  त्यानंतर उरण मतदारसंघाचे शेकापचे अस्तित्व संपुष्टात आले.  पनवेल, उरण नंतर पेणमधील उरले सुरले शेकापचे अस्तित्व धैर्यशील पाटील यांच्या प्रवेशानंतर शेकापला या मतदारसंघात धक्के बसू लागले.

पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापूर्वी शेकापाचे वर्चस्व होते.  मात्र धैर्यशील पाटील व रवी शेठ पाटील या दोन पाटलांनी शेकापचे अस्तित्व संपवून अलिबागच्या पाटलांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. ज्या पद्धतीने पनवेल, उरण व पेण या मतदारसंघात शेकाप बाहेर फेकला गेला, त्याच पद्धतीने अलिबाग मतदार संघात देखील सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांना सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या महेंद्र दळवी यांच्याकडून धक्का बसला.  त्यामुळे रायगडात शेकाप हद्दपार झाला की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपरिषदा, जिल्हा परिषदा व पंचायत समिती याबरोबरच विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शेकापची कोणती भूमिका राहील यावरच शेकापाचे भवितव्य अवलंबून आहे. 

रायगड जिल्ह्यातून सध्या शेकापचा विधानसभेत एकही आमदार नाही.  एकमेव विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांच्याकडेच आहे.  तसेच मागील वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर नगरपरिषदा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका न झाल्याने त्याचप्रमाणे राज्यातील शेकापची भूमिका नेमकी सत्ताधारी भाजपा शिंदे – फडणवीस सरकार बरोबर की महाविकास आघाडीबरोबर याचा अंदाज शेकापच्या कार्यकर्त्यांना येत नसल्याने शेकापचे जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. 

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदारांपैकी सात लाख 80 हजार 290 मते विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मिळाली होती.  तर सात लाख 52 हजार 400 मते सेनेचे अनंत गीते यांना मिळाली होती.  यामध्ये पेण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे व सेनेचे अनंत गीते यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ एक हजार मतांचा फरक होता. 

अलिबाग नंतर पेण

दक्षिण रायगड भाजपाचे विद्यमान अध्यक्ष एडवोकेट महेश मोहिते हे मागील वर्षी एका महिलेने केलेल्या आरोपात अडकले होते.  त्यानंतर काही काळ ते अज्ञातवासात गेले होते.  त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपाचे काम चालू केले. मात्र त्यांचा दक्षिण रायगड विभागात प्रभाव पडला नाही.  मात्र रायगड लोकसभा मतदारसंघात निवडून यायचे असल्यास 24 तास जनतेमध्ये वावरणारा कार्यकर्ता पाहिजे.  त्यामुळे धैर्यशील पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर दोनच महिन्यांनी त्यांना दक्षिण रायगड भाजपा अध्यक्षपद देण्यात येऊन भाजपा रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दक्षिण रायगड भाजपा अध्यक्ष होण्यासाठी महाडमधील दोन नेते इच्छुक होते. मात्र हे दोन नेते कायम एकमेकांचे पाय खेचण्यात माहीर आहेत. त्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींनी चाचपणी देखील केली व या दोघांच्या विरोधात जनमानसामध्ये विरोधातील वातावरण असल्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे गेला होता.  महाडमधील हे दोन्ही भाजपाचे नेते पक्षाकडून येणारा निधी असो की विकास कामांचा निधी असो, सर्वकाही आपल्यालाच पाहिजे अशी सातत्याने भूमिका घेत असतात.  त्यातच भाजपला एकही ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही.  महाड तालुक्यात या दोघांच्या हेवेदाव्यामुळे कार्यकर्ते देखील भाजपा पक्षापासून दुरावले गेले. 

भाजपाचे वरिष्ठ नेते, मंत्री महाडमध्ये आले तरी हे दोनच नेते सातत्याने पुढे असायचे.  कार्यकर्त्यांना कधीच त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला नाही.  केवळ मला हवे या हव्यासापोटी भाजपाचे कार्यकर्ते पक्षापासून लांब गेले.  येत्या काळात या दोन नेत्यांमधील कोणता नेता दुसऱ्या पक्षात उडी मारेल हे सांगू शकत नाही, असे भाजपाचे कार्यकर्ते खुलेआमपणे बोलत आहेत.  त्यामुळे अलिबाग नंतर पेण मधून दक्षिण रायगड जिल्ह्याची भाजपाची सूत्रे हलणार आहे. 

दक्षिण रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून धैर्यशील पाटील यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा गेल्यानंतर भाजपा किती जोमाने दक्षिण रायगडमध्ये काम करते व भाजपाचे युवा नेतृत्व महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा ,तळा सुधागड, रोहा या तालुक्यातील युवा नेतृत्वांना किती साथ देते.  यावरच रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे गणित अवलंबून असणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here