शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटले
Twitter : @maharashtracity
मुंबई: शिवसेनचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेमीकोमाच्या गंभीर स्थितीत त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु असल्याचे हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची गरज लागण्याची शक्यता हिंदुजा रुग्णालयाने व्यक्त केली.
जोशी सरांना सोमवारी रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना उशिरा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करताना ते गंभीर स्थितीत होते. मात्र त्यांना व्हेंटिलेटरवरची गरज लागत नसून ते स्वतःहून श्वास घेत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांना ब्रेन ट्यूमर स्थितीतील गुंतागुंत आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असली तरी देखील वैद्यकीय उपचारातील गंभीर व्यवस्थापनाची गरज असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरें भेटले :
मनोहर जोशी यांच्या प्रकृतीस्वास्थाच्या चौकशीसाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. मनोहर जोशी यांच्यावर डॉ. चारूलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्राथमिक पातळीवर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षापासून जोशी सर राजकारणापासून दूर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील जोशी सर हे पहिल्या फळीतील जुने नेते आहेत. १९९५ साली शिवसेना-भाजपाच्या सरकारचे ते मुख्यमंत्री होते. तसेच त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. मनोहर जोशी यांनी आतापर्यंत नगरसेवक, महापौर, विधानपरिषद सदस्य, लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे अनेक पद भूषवले आहेत. गेल्या वर्षीच्या जून मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी सरांची भेट घेतली होती.