X : @milindmane70

महाड: शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासहित देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज रायगडावर हजेरी लावतात. मात्र, किल्ल्यावर व चित्त दरवाजा ते जिजामाता समाधी या पट्ट्यात सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. रायगड प्राधिकरण नको त्या कामावर खर्च करून लाखो रुपयांची उधळपट्टी करत असल्याने रायगड बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीत दोन मार्गाने जाता येते, एक हिरकणी वाडी येथील रोपवेने तर दुसरा चित्त दरवाज्याने पायी पायऱ्या चढत रायगड किल्ल्याची सफर पर्यटक करतात. किल्ला पाहण्यासाठी दररोज सुमारे 40 ते 45 बसेस मधून राज्याच्या विविध जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षकांसोबत रायगड किल्ला पाहतात. तसेच 20 ते 25 खाजगी बसेस मधून देखील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या प्राध्यापकांसहित रायगड किल्ला पाहण्याचा आनंद घेतात. या सर्व बसेस मधील विद्यार्थिनी व विद्यार्थी व त्यांचे शिक्षक वर्ग हे चित्त दरवाजामार्गे रायगड किल्ल्यावर पायी मार्गक्रमण करतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग येत असताना कोणत्याही प्रकारे चित्त दरवाज्यापासून ते पाताळ येथील जिजामाता समाधी ते जिजामातेचा राजवाडा या पट्ट्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसल्याने अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी झाडीझुडपांचा आधार घेऊन लघु शंका करण्यासाठी जातात. शौचालयाची कोणतीही व्यवस्था या तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात नसल्याने हजारो पर्यटक राज्य शासनाला व लोकप्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

किल्ल्यावर आतापासूनच मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. असे असताना सार्वजनिक शौचालयासाठी पाणी कुठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न देखील प्रशासनापुढे उभा राहिला आहे. तीच परिस्थिती जिजामाता समाधी ते जिजामातेचा राजवाडा या परिसरात पाहण्यास मिळते. दररोज येणारे हजारो पर्यटक व शिवभक्त यांना अखेर पाचाड ते हिरकणी वाडीपर्यंत असणाऱ्या खाजगी उपाहारगृह हॉटेल मालकांचा सहारा घ्यावा लागतो.

रायगड किल्ल्यावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्याप्रमाणे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करते, त्याच पद्धतीने जानेवारी ते मे या कालखंडात लाखो पर्यटक रायगड किल्ला पाहण्यासाठी येत असतात. या पर्यटकांना प्रशासनाने मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व शिक्षकांचे तसेच आबाल वृद्धांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here