Twitter : @milindmane70
महाड
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मागील पाच वर्षापासून फटाके विक्रीची दुकाने खुल्या मैदानात मांडली जावीत, असे कागदोपत्री नमूद असेल तरी प्रत्यक्षात हि दुकाने भरवस्तीत, रस्त्याकडेला, पालिकेच्या नाल्यावर सुरु केली जात आहेत. याबाबत नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. पोलादपूरमध्ये मागील आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाडमध्ये घडवायची आहे का? असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारीत आहेत.
महाड शहरात मुख्य बाजारपेठेतील भर वस्तीमध्ये व वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर शहरात फटाके विक्रीसाठी दुकान उघडताना अनेक नियम आणि अटी आहेत. फटाक्यांपासून अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रकार देखील महाराष्ट्रात घडल्या आहेत.
पोलादपूर तालुक्यात मागील आठ वर्षांपूर्वी फटाक्याच्या दुकानाला आग लागून संपूर्ण बाजारपेठ जळून खाक झाली होती,लाखो रुपयांचे दुकानदारांचे नुकसान झाले होते. ते नुकसान आज देखील भरून आलेले नाही. असे असताना व याची पूर्ण कल्पना प्रशासनाला असताना देखील शहरातील मुख्य रस्त्यांवर विनापरवाना फटाके विक्रीचे दुकाने राजरोसपणे लावली आहेत.
फटाक्याची दुकाने रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या मैदानात लावताना देखील फटाक्यांच्या दुकानासाठी कडक नियमावली आहे. मात्र, या नियमावलीला महाड शहर परिसरात हरताळ फासल्याचे मागील पाच वर्षापासून दिसत असून त्याची पुनरावृत्ती चालू वर्षी देखील फटाके दुकानदारांनी केली आहे.
महाड शहरातील फटाके दुकानदारांसाठी परवाना घेणे आवश्यक असताना मागील चार वर्षात केवळ परवान्यासाठी अर्ज केल्याचे कागदपत्रे दिसत आहे. कोणालाही मागील चार वर्षात परवाना देण्याचे काम महसूल शाखा, पोलीस स्टेशन अथवा नगरपालिका प्रशासनाकडून झालेले नाही. असे असताना देखील त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी देखील झाली आहे. परवाना देण्याअगोदरच फटाके दुकानदारांनी आपली दुकाने भर रस्त्यात व सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी लावली आहेत.

फटाके दुकानदारांसाठी असणाऱ्या नियमावलीचे फक्त कडक नियमांचे पालन कागदावरच केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री केली जावू नये, असा नियम असला तरी या नियमाला पायदळी तुडवून परवाने मिळण्याआधीच सर्रास फटाके विक्री सुरु झाली आहे.
महाड शहरात महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महाड नगर पालिका यांच्या संयुक्त तपासणीतून परवाने दिले जातात. कार्यालयात बसून हे परवाने दिले जात असल्याने प्रत्यक्षात फटाके विक्रेते बेजबाबदारपणे फटाके विक्री करताना दिसून येतात.
महाड नगरपालिकेने यावर्षी छ. शिवाजी चौक येथील राजमाता जिजाऊ गार्डन समोरील मोकळी जागा दिली आहे. मात्र प्रत्यक्षात महाडच्या मुख्य रस्त्यावर छ.शिवाजी चौक ते एस.टी. स्थानकाकडे जाणारा मार्ग, छ.शिवाजी चौक, छ. शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी, मुख्य बाजारपेठ, अशा ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने सुरु करण्यास सुरवात झाली आहे.
महाड शहरात अनेक वर्ष फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, महाड नगर पालिकेकडे काही फटाके विक्रेत्यानी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत अद्याप ना हरकत दाखला दिलेला नसतानाच महाड शहराच्या छ. शिवाजी महाराज मार्गावर रस्त्यालगत फटाके विक्री स्टॉल उभारण्यास सुरवात झाली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेरीवाले आणि औद्योगिक क्षेत्रातील बसेस, रिक्षा उभ्या असतात. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होतेच, शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही ठिकाण धोकादायक आहेत.
शहरात फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे आग विझवण्यासाठी फायर सिस्टीम असणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील ज्या ज्या ठिकाणी फटाके विक्रेत्यांचे दुकाने आहेत, त्या – त्या ठिकाणी कोणतीही फायर सिस्टीम नसल्याने व ही दुकाने भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने उद्या आकस्मिक आग लागल्यानंतर जर अनुचित प्रकार घडला, तर याची जबाबदारी नगरपालिका, पोलीस यंत्रणा की महसूल यंत्रणेची आहे? याबाबत कोणीही सुस्पष्टपणे सांगण्यात तयार नाही. यामुळे फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांचे फावले आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या फटाके विक्रेत्यांनी कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने अंमलबजावणी केली नसल्याने महाड शहरात पोलादपूरच्या घटनेची पुनरावृत्ती प्रशासनाला करायचे आहे का? असा सवाल महाडमधील नागरिक प्रशासनाला विचारीत आहेत.