Twitter :@maharashtracity

मुंबई

संपूर्ण जगात भारत संस्कृतीचा केंद्रबिंदू असून देशात वेळोवेळी जन्मलेल्या संत व महापुरुषांनी या भूमीला पवित्र केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक गुरु असलेले श्रीमद राजचंद्र हे याच आकाशगंगेतील थोर महापुरुष होते. त्यांचे मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक लोकसांसाठी प्रेरणास्पद ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी आज येथे केले.

श्रीमद राजचंद्र यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्नी रोड स्टेशनजवळ निर्माण करण्यात आलेल्या श्रीमद राजचंद्र स्मारकाचे उदघाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते सोमवारी (दि. २७) संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais), कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha), श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेशजी, श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यक्ष अभय जेसानी, उपाध्यक्ष आत्मप्रीत नेमी व निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी रॉयल ऑपेरा हाऊस येथे आयोजित ‘आत्मकल्याण दिवस’ कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपतींनी श्रीमद राजचंद्र मिशन ही संस्था जनसामान्यांची सेवा, तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपक्ष्यांचे औषधोपचार हे दैवी कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

मिशनचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेशजी आपल्या प्रवचन व सेवाकार्यातून जगात शांतता व सेवेचा संदेश देत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

संसदेच्या सभागृहात चर्चा व विचार विनिमय होण्याऐवजी गदारोळ व कटुता निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना संसद सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचे प्रवचन ऐकले तर त्याचा त्यांचेवर सकारात्मक परिणाम होईल असे धनखड यांनी सांगितले.

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनामध्ये श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा प्रभाव हा समानतेचा धागा असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमद राजचंद्र एक यशस्वी उद्योजक होते. संसाराचा त्याग करून त्यांनी आत्मकल्याणाचा प्रशस्त मार्ग निवडला. त्यांच्या नावाने कार्यरत असलेले श्रीमद राजचंद्र मिशन मानवतेची उत्कृष्ट सेवा करीत आहे असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

श्रीमद राजचंद्र हे शतावधानी होते. त्यांची महात्मा गांधी यांचेशी पहिली भेट मुंबई येथे झाली होते, असे राज्यपालांनी सांगितले. समाजातील एक मोठा वर्ग उपेक्षित व अभावग्रस्त जीवन जगताना दुसरा वर्ग ऐशोआरामात जगत असेल तर कुणीही शांतीने राहू शकणार नाही, असे सांगून गरीब व अभावग्रस्त लोकांचा विचार शांततेचा मार्ग प्रशस्त करेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी गुरुदेवश्री राकेशजी यांनी उपराष्ट्रपतींना ‘जनकल्याण हितेशी’ पुरस्काराने सन्मानित केले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑपेरा हाऊसच्या मागच्या ‘मॅथ्यूज रोड’चे नामकरण ‘श्रीमद राजचंद्र मार्ग’ असे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here