कारवाई करण्यात प्रदूषण मंडळाचा हलगर्जीपणा

महाड

मागील चार दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी आणि नागरिकांचे पुरते हाल होत असतानाच औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. अवकाळी पावसाचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन आणि कंपनीमधील केमिकलयुक्त पाणी औद्योगिक क्षेत्रातील गटारामध्ये सोडल्याने गटारे काळया निळ्या रंगाच्या पाण्याने तुंबली आहेत.

यापूर्वी ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या पाण्याबाबत तक्रारी झाल्या होत्या, त्याठिकाणी असलेल्या कारखान्यांवर कारवाई झाली नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. 

महाड औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि रासायनिक कंपन्यांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून दरवर्षी सांडपाणी नदीत अथवा शेजारील नाल्यात सोडण्याचे प्रकार गेली अनेक वर्ष सुरू आहेत. या कारखान्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांचेदेखील हात कारवाईसाठी पुढे होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी टायटन कंपनीच्या शेजारील नाल्यात टायटन कंपनीच्या समोरील कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया (sewage water) न करताच गटारात सोडले गेले होते. यावेळी तक्रारी झाल्या, मात्र या सांडपाणी प्रकरणी कारवाई झाली नाही. यामुळे याच ठिकाणी आता देखील रासायनिक सांडपाणी रस्त्यालगत असलेल्या गटारातून थेट जिते टेमघर नाल्यामध्ये गेले आहे. यामुळे जिते गावाच्या शेजारून वाहणारा नाला पूर्णपणे प्रदूषित झाला आहे. 

अशीच परिस्थिती महाड औद्योगिक (Mahad MIDC) वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी दिसून येत आहे, त्या औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन कंपनीपासून थेट आवश्यक गावापर्यंत पसरलेल्या नदी नाल्यांमध्ये सध्या अवकाळी पावसानंतर वाहणाऱ्या पाण्यातून रासायनिक सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन मिसळत आहे. महाड औद्योगिक क्षेत्राला प्रदूषणाचा वारसा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हा प्रदूषणाचा शिक्का दूर करण्यासाठी महाड उत्पादक संघटनेने प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना काही अंशी यश मिळाले असले तरी औद्योगिक क्षेत्रातील अनेक लघु कंपन्या, रासायनिक क्षेत्राशी संबंधित लघु व्यवसायिक यांच्याकडून जाणीवपूर्वक रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार केला जातो. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. त्यातच महाड औद्योगिक वसाहतीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे आणि या लघु कंपन्या, व्यवसायिक यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील कारवाई करत नाहीत. 

महाड औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कारखाने हे रासायनिक प्रक्रिया करणारे आहेत. या उत्पादनातून त्यांना करोडो रुपयांचा फायदा होतो. असे असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्यास हे उद्योजक आपला हात आखडता घेतात. प्रत्येक कंपनीने आपल्या परिसरातच रासायनिक सांडपाणी प्रक्रिया काटेकरपणे केल्यास गटारे आणि नाल्यामध्ये सांडपाणी येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, मात्र या उपायोजना करताना लागणारा खर्च करण्यास या कंपन्यांकडून हात आखडता घेतला जात आहे. एम.आय. डी.सी. परिसरात सी एस आर च्या माध्यमातून आपण सामाजिक काम करत आहोत, असे भासवून दुसरीकडे मात्र सांडपाणी सोडून प्रदूषण करत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महाडमधील उपविभागीय अधिकारी कार्यालय हे फक्त नावापुरतेच असून या ठिकाणाहून केवळ नोटीस बजावण्याचे काम केले जात आहे. प्रदूषण रोखण्यास या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.

एकंदरीतच महाड औद्योगिक वसाहतीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडून प्रदूषण झाले असताना देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून केवळ वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून कागदोपत्री घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here