X: maharashtracity
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्यावर सामाजिक क्रांती केली, त्या चवदारतळयाचे शासनाने सौंदर्यीकरण करून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. याठिकाणी उभारलेल्या सभागृहाच्या दर्शनी भागावर तीन अर्ध गोलाकार खिडक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्लास पेंटींग बसविले आहेत. या पेंटींगची सद्य स्थितीत दुरावस्था झाली आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळयातील पाणी प्राशन करून दलीतांना त्यांचे न्यायहक्क प्राप्त करून दिले. पाण्याच्या या क्रांतीची साक्ष देणारे चवदार तळे हे संपुर्ण दलीत समाजासाठी तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. संपुर्ण देशभरातुन दलीत आणि बहुजन समाज चवदार तळे पाहण्यासाठी महाडला भेट देतात. दलीत समाजाची ही चवदार तळयाबाबतची भावना लक्षात घेउन महाड नगर पालिकेने महाराष्ट् शासनाच्या माध्यमातुन १९९४ मध्ये चवदार तळयाचे सुशोभिकरण केले. यावेळी येथे भव्य असे सभागृह उभारण्यात आले. या सभागृहाच्या दर्शनी भागात तीन अर्धगोलाकर खिडक्या ठेऊन त्या खिडक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत देखावे लावण्यात आले. हे देखावे सभागृहाच्या आतुन आणि बाहेरून दिसावेत म्हणुन हे देखावे ग्लास पेंटींग प्रमाणे तयार करण्यात आले होते. पारदर्शक फायबरवर ही पेंटींग करण्यात आली होती. सुमारे १८ वर्ष लोटल्यानंतर आता हे देखावे खराब झाले आहेत. त्यांचे रंग उडाले आहेत. त्यामुळे येथे काढण्यात आलेली चित्र विद्रुप झाली आहेत.
या सभागृहात खाजगी आणि शासकीय दोन्ही प्रकारचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी महाड नगर पालिकेचे कर्मचारी २४ तास कामावर हजर असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये दर्शनी भागात लावलेले त्यांच्याच जीवनावरील देखावे विद्रुप झाल्याचे कोणलाच कधी दिसले नाही, याचे आश्चर्य वाटत आहे.
महाड नगरपरिषद व राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आता याकडे लक्ष देणार की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी मशगुल होणार असा सवाल आंबेडकर अनुयायी विचारत आहेत.