By Milind Mane

Twitter : @ManeMilind70

महाड: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्मी दर्शनामुळे महाड, पोलादपूर, श्रीवर्धन व महसळा या चार तालुक्यातील गावोगावी अनधिकृत दारू धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. नवीन तरुण पिढी व्यसनाधीन होत असताना अनधिकृत दारू व्यवसायाला अभय देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे महाड येथील निरीक्षक दर्जाचे अधिकारी करीत असल्याने ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीला आली आहे.

महाड येथे नवे नगर भागात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक दर्जाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून महाड, पोलादपूर, श्रीवर्धन व महसळा या चार तालुक्याचा कार्यभार हाकला जातो. मात्र या कार्यालयात असणारे निरीक्षक व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी बेकायदेशीर दारू धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा अनधिकृत दारू धंद्यांना अभय देण्याचे काम करीत असल्याचा आरोप होत आहे. या चार तालुक्यामधील ग्रामीण भागात गावोगावी व वाड्यावाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दारू विक्रीचे काम सुरू असून त्याला महाड येथील निरीक्षक दर्जाचे अधिकारी जबाबदार असल्याचे ग्रामीण भागात जनतेकडून याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

या तालुक्यांमध्ये असणाऱ्या बियर शॉपी मध्ये मोठ्या प्रमाणावर बियर ऐवजी छुप्या पद्धतीने देशी-विदेशी दारू विकली जाते. या सर्व गोष्टी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असल्याचा दावा केला जातो. तरीही त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई केली गेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here