Twitter : @NalavadeAnant

मुंबई: राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि बंडखोर गटाचे नेते आणि यांचीच खरी राष्ट्रवादी असा दावा करणारे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी आज स्वतंत्र बैठक, मेळावे घेऊन शक्ति प्रदर्शन केले. पक्षाच्या एकूण 53 आमदारांपैकी 33 आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. तर शरद पवार यांच्या बैठकीला 16 आमदार उपस्थित होते, तर दोन आमदारांनी शरद पवार यांना समर्थन दिले मात्र, ते बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे शक्ति प्रदर्शन आणि संख्याबळ जुळवण्यात पुतण्याने काकांना कात्रजचा घाट दाखवला असे म्हटले जात आहे.   

अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य आठ आमदारही शपथबद्ध झाले. अजित पवार यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत दोन्ही गटाकडे विधानसभेतील किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शरद पवार यांच्या गटाची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीसाठी खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा आज फोल ठरला. आजच्या बैठकीला विधानसभेतील १६ ,विधान परिषदेतील ३ आमदार तर लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून पाच खासदार उपस्थित होते.  

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला विधानसभेतील ३३ आमदारांसह, विधान परिषदेतील रामराजे नाईक निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे हे आमदार तर राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा सदस्य सुनील तटकरे उपस्थित होते. याशिवाय बैठकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील आजच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार सरस ठरल्याचे चित्र दिसले.

शरद पवार यांच्याकडील आमदार: जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), अशोक पवार (शिरूर), मकरंद पाटील (वाई ), प्राजक्त तनपुरे (राहुरी), चेतन तुपे (हडपसर), चंद्रकांत नवघरे (बसमत), रोहित पवार (कर्जत जामखेड), रोहित सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), किरण लहामटे (अकोले), संदीप क्षीरसागर (बीड), मानसिंग नाईक (शिराळा), दौलत दरोडा (शहापूर) आणि अपक्ष देवेंद्र भुयार  (मोर्शी). यापैकी मकरंद पाटील (नवघरे) आणि दौलत दरोडा बैठकीला उपस्थित नव्हते. 18 

विधान परिषद सदस्य: एकनाथ खडसे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंदे 
लोकसभा सदस्य :  श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे

राज्यसभा सदस्य :  वंदना चव्हाण, फौजिया खान

अजित पवार यांच्याकडील आमदार : छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे – पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), आशुतोष काळे (कोपरगाव), माणिकराव कोकाटे (सिन्नर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दिपक चव्हाण (फलटण), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), इंद्रनील नाईक (पुसद), शेखर निकम (संगमेश्वर), नितीन पवार (कळवण), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), राजेश पाटील (चंदगड), दिलीप बनकर (निफाड), अण्णा बनसोडे (पिंपरी), अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), यशवंत माने (मोहोळ), दिलीप मोहिते (खेड आळंदी), नीलेश लंके (पारनेर), बबनराव शिंदे (माढा), सुनील शेळके (मावळ), प्रकाश सोळंके (माजलगाव),

विधान परिषद सदस्य: अमोल मिटकरी, रामराजे निंबाळकर, अनिकेत तटकरे, विक्रम काळे  

लोकसभा सदस्य : सुनील तटकरे

राज्यसभा सदस्य : प्रफुल्ल पटेल

तटस्थ भूमिका असलेले आमदार: नवाब मलिक आणि सरोज अहिरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here