X : @milindmane70

महाड: महाडमध्ये २० मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह स्मृतिदिन (Mahad Satyagraha) गेल्या अनेक वर्षापासून साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक भागातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. यावर्षी देखील १९ मार्च रोजी शिवराय ते भीमराय अशी समता रली काढण्यात आली.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी १९ – २० मार्च १९२७ रोजी ऐतिहासिक चवदार तळे येथे सामाजिक क्रांती केली. देशातील तमाम दलित, शोषित, पीडित आणि तळागाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरिता चवदार तळे येथे सत्याग्रह केला. या दिनाचा स्मृतीदिन महाड क्रांती भूमीत साजरा केला जातो. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक (Bhim Sainik) दर वर्षी महाडला येऊन चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. यावर्षी देखील या क्रांती दिनाच्या निमित्ताने लाखो भीमसागर १९ मार्च पासूनच दाखल झाले आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, कोकण रिपब्लिकन पार्टी संघटना आदि आंबेडकरी चळवळीतील राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या सभा यानिमित्ताने होणार आहेत. याकरिता महाड नगर प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भीमसैनिकांना पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मंडप, भोजन व्यवस्था, विविध संस्थांकडून करण्यात आली आहे, यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने मंत्री, किंवा राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार नाहीत. मात्र राज्यातील लाखो भीमसैनिक मात्र महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here