X : @milindmane70
महाड: महाड तालुक्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना धुळीचा (dust pollution) नाहक त्रास होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा शिडकावा केला जात नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्य देखील बिघडले आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग (National Highwat Authority of India) दुर्लक्ष करत आहे.
तालुक्यामध्ये सध्या महाड – रायगड रस्ता, म्हाप्रळ- महाड- भोर- पंढरपूर, मुंबई – गोवा महामार्ग त्याचप्रमाणे अनेक गावात, खेडोपाडी रस्ते आणि मोऱ्यांची कामे सुरू आहेत. गेली दोन वर्षांहून अधिक काळ हे काम सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाड – रायगड हा मार्गाचे दुरुस्तीचे काम देखील गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे ही कामे रखडलेली आहेत. ठेकेदार काम पूर्ण करण्याच्या नादात किती दिवसात किती काम पूर्ण होईल याकडे न पाहता संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करून सोडून देत आहे.
खोदलेला रस्ता तसाच ठेवून अन्य ठिकाणी कामे केली जात असल्याने ज्या ठिकाणी खोदकाम आणि भराव केला जात आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळ तयार होत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर टाकलेल्या मातीचा भुगा होऊन ही माती हवेबरोबर नागरिकांच्या घरांमध्ये आणि तोंडावाटे शरीरात शिरकाव करत आहे. यामुळे शेकडो नागरिक श्वसनाच्या विकाराने त्रस्त झाले आहेत.
महाड – रायगड मार्गावरील कोंझर ते किल्ले रायगड, राजमाता जिजाऊ माँसाहेब समाधी आणि पाचाड, नाते खिंड ते तेटघर या दरम्यान रस्त्यासाठी खोदकाम करून भराव करण्यात आला आहे. या मार्गावर पाणी शिंपले जात नसल्याने धुळीचे लोट उठत आहेत. अशीच स्थिती म्हाप्रळ – महाड- भोर -पंढरपूर मार्गावर देखील आहे. म्हाप्रळ गावापासून थेट शिरगावपर्यंत रस्त्याचे काम जागोजागी सुरू आहे. हे काम देखील रडतखडत सुरू आहे. यामुळे या मार्गावर देखील धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे.
राजेवाडी गावापासून वरंध गावापर्यंत खोदकाम झालेले असून या ठिकाणी देखील प्रचंड धूळ तयार झाली आहे. या धुळीने देखील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या धुळीमुळे रस्त्याशेजारी असलेल्या घरांमधील नागरिकांना श्वसनाचे विकार (Respiratory disorders) जडले आहेत. रस्त्यावर पाणी मारा असे सांगून देखील ठेकेदार लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या धुळीमुळे रस्त्याकडेला असलेले छोटे लघु व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेल चालकदेखील त्रस्त झाले आहेत.
महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे (NHAI) अभियंता व कार्यकारी अभियंता हे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कितीही तक्रारी केल्या तरी त्याचे दखल घेण्याचे सौजन्य हे अधिकारी दाखवत नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही ठेकेदाराला नोटीस देखील पाठवणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी घेत असल्याने व तालुक्यातील राज्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठेकेदाराकडून काम मिळत असल्याने ते देखील नागरिकांच्या तक्रारीकडे जाण्यापूर्वी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.