By Milind Mane

Twitter: @milindmane70

महाड: 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन तरुणांचा मृत्यू झाला असताना आज पुन्हा एकदा एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. त्याच्या मृत्यूला रायगड प्राधिकरणकडून सुरू असलेले नित्कृष्ट काम कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

रायगड किल्ला चढत असताना किल्ल्यावरील दगड डोक्यात पडून प्रशांत गुंड (२८) या पुण्यातील शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजता घडली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांमध्ये प्रशासनाच्या गैर कारभाराविरोधात असंतोष पसरला आहे.

रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करुन त्या विरोधात रायगड परिसरातील 21 गावातील ग्रामस्थांनी यापूर्वी आवाज उठवला होता. 21 गाव पंचक्रोशी विकास प्राधिकरण संघर्ष समितीचे सेक्रेटरी सुभाष मोरे व निलेश धुमाळ यांनी यापूर्वी शासनाला रायगड विकास प्राधिकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले होते. मात्र प्राधिकरणाने दखल न घेतल्याने आज अखेर दगड कोसळून पुण्यातील शिवभक्ताने आपला जीव गमावला. आता या सर्व प्रकाराला रायगड प्राधिकरणाची निकृष्ट दर्जाची कामे जबाबदार असून या निकृष्ट दर्जाची कामे करून घेणाऱ्या रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर राज्य शासन कोणती कारवाई करते याकडे लाखो शिवभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here