By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा सडेतोड भाषेत समाचार घेतला. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. देशाला हुकूमशाही विचारातून वाचवले पाहिजे. यासाठी भाजपला तडीपार केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांना केले. 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे यांची महाड येथील चांदे क्रीडांगणावर सभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी गद्दरांचे डीपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने हा नीच डाव खेळला, यामुळे मी सत्तेत नाही, मात्र शिवसेना पक्ष उभी करणारी सर्व माणसे माझ्या बरोबर आहेत, असे ते म्हणाले.

कोकण उध्वस्त होत असेल तर बारसूसारखा असा प्रयोग होऊ देणार नाही. आधी कोकणच्या माणसाची चाचणी करा, मगच मातीची चाचणी करा. आमचे ऐकले नाहीत तर बारसुमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उतरवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. दरड दुर्घटनेबद्दल ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला. तळीयेसह पोलादपूरमध्ये ज्या गावात दरडी कोसळल्या होत्या, त्या गावातील दरडग्रस्तांना दोन वर्षे होऊन देखील एकही घर का मिळाले नाही ? असा सवाल सरकारला मुख्यमंत्री अशा कर्नाटकला गेले जिथे महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय केला जात आहे आणि महाराष्ट्राचा लाचार मुख्यमंत्री भांडी घासायला गेलेत, अशी सणसणीत टीका केली.

सरकारला प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे, तो देशद्रोह ठरतो. आमचं हिंदुत्व देवळात घंटा वाजवणारे नाही, आम्हाला तसे हिंदुत्व नको, सीमेवर लढणारे हिंदुत्व पाहिजे याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाडमध्ये केला.  कायद्याचं नाव सांगून अत्याचार कराल तर खापवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

महाड येथील चांदे क्रीडांगणावर

लावलेले फटाके थांबता थांबेना मग…

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले आणि लावलेले फटाके थांबता थांबेनात. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाषण थांबवत अरे जरा पाणी ओता असे म्हणत आधी विजय मिळवू मगच फटाके वाजवू असे सांगितले. शिवसैनिक पेटले की ऐकत नाहीत, मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजतील असा सणसणीत टोला यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतला. जे व्याज व्यवहार करून लुबाडी करतात ते म्हणजे शेठ असे सांगून भंगारातून करोडो रुपये छापणाऱ्या शेठ पासून सोन्यासारख्या महाडला वाचवा असे आवाहन त्यांनी केले. सुभाष देसाई यांनी यावेळी बोलताना महाडचं संपूर्ण चित्र या सभेने बदलेल असे मत व्यक्त करून बारसूमधील झालेले जमीन व्यवहार रद्द झाले पाहिजेत अशी मागणी केली. 

रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेना नेते अनंत गीते यांनी भुताला बाटलीत बंद करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले.  

यावेळी महाडचे माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप, पुत्र श्रेयस जगताप आणि बंधू हनुमंत जगताप यांच्यासह महाड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांना शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना स्नेहल जगताप यांनी आपल्याला महाडमध्ये बरंच काम करायचं आहे. स्व. माणिकराव जगताप यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या पक्षात सामील झाल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here