Twitter : @maharashtracity
मुंबई: बीएच्या तृतीय वर्ष सत्र ५ मानसशास्त्र विषयाचा विद्यापीठाने जाहिर केलेला निकाल वादग्रस्त ठरत आहे. या निकालाच्या विरोधात विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे या निकालाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. यातून निकालातच त्रुटी असल्याचे दिसून आले. त्यामुळे या समस्याच्या निवारणासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए सत्र ५ मानसशास्त्र विषयाचा निकाल विद्यापीठाने २९ एप्रिल २०२३ रोजी जाहीर केला. या निकालाबाबत विद्यापीठाकडे विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालये यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बुधवारी याबाबत प्राथमिक चौकशी केली असता या निकालात काही त्रुटी असल्याचे जाणवले. या निकालातील कोणत्या त्रुटी आहेत याची शहानिशा करण्यासाठी विद्यापीठाने बुधवारी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवराम गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समितीची स्थापना केली.
ही समिती निकालातील त्रुटी व विद्यार्थ्यांना मिळालेले जास्त गुण किंवा मिळालेले कमी गुण याचेही मूल्यमापन करणार आहे. या समितीला तत्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.