Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये अत्यावस्थेत दाखल झालेल्या ४१ वर्षीय पुरुषाचा ४ मे रोजी मेंदूमृत झाला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने पाच जणांना जीवनदान मिळाले आहे.
अत्यावस्थेत दाखल झालेल्या ४१ वर्षीय पुरुषावर सर्व प्रकारचे उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान ४ एप्रिल रोजी त्याचा मेंदूमृत झाला. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व अवयवदान समन्वय समितीच्या सदस्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देत त्यांना अवयवदान करण्याची विनंती केली.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून अवयवदान करण्यात आले. या व्यक्तीचे हृदय, फुफ्फुस, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. यामुळे पाच जणांना जीवदान मिळाले असल्याची माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली.