By Milind Mane
Twitter : @manemilind70
महाड: काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या व महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप व माणिकरावांचे बंधू हनुमंतराव जगताप यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशासाठी महाड मधील चांदे क्रीडांगणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 6 मे रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे फडणवीस – शिंदे व पवारांसह मित्र पक्षांचा समाचार घेणार असल्याचे संकेत आहेत. या जाहीर सभेतून महाराष्ट्राच्या संभाव्य राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.
महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील सद्यस्थितीच्या राजकारणावर भाष्य करणार असल्याचे संकेत आहेत. या
सभेसाठी रायगड जिल्ह्यासह तळ कोकणातून शिवसैनिक हजेरी लावणार आहेत. ही सभा न भूतो न भविष्यती अशी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ही सभा विराट होईल असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी महाड येथे बोलताना व्यक्त केला.
यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९८५ मध्ये शिवसेनेचे दुसरे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन महाड येथे घेतले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई जिंकली होती. पुढे सेनेची घोडदौड सुरू राहिली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेना – भाजप युतीचे राज्य स्थापन झाले. आता तशीच परिस्थिती आहे आणि आता पुन्हा उद्धव ठाकरे यांची महाडमधील त्याच चांदे क्रीडांगणावर होणारी सभा ऐतिहासिक होईल असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.