राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची शरद पवारांची घोषणा

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: मला सुरुवातीला आपण सर्वांनी माफ करा…… आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो असून यापुढे पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन……. अशा काहीशा भावनात्मक शब्दात राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याची व पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याची घोषणा खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली. 

मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला निर्णय आत जाहीर केल्यानंतर बाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने आपला आनंद व्यक्त केला. 

यावेळी बोलताना पवार यांनी स्पष्ट केले की, २ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आपण जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून राजीनामा मागे घेण्याचे मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली असेही पवार यांनी यावेळी नमूद केले. 

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे असे ठरवले, या निर्णयाचा देखील मान राखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. 

मी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन, अशी स्पष्ट भूमिकाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली. 

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश-अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करते वेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दलही पवार यांनी ऋण व्यक्त करतानाच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केरळचे आमदार के. थॉमस, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदींसह पक्षाचे आमदार, प्रवक्ते, पदाधिकारी उपस्थित होते. तर अजित पवार अनुपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here