काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा टोला

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत. परंतु देव आणि देवाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटना यातील फरक पंतप्रधानांना कळत नाही हे देशाचे दुर्भाग्य असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, बजरंगबलीचे भक्त आम्हीही आहोत, त्याची उपासनाही करतो. पण त्याचा सार्वजनिक दिखावा करत नाही. धर्माच्या नावाने जनतेला लुटणाऱ्या संघटना नसाव्यात, परंतु काही लोक धर्माच्या नावाने लुटत आहेत. देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था कोणत्याही धर्मात असेल तर त्या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे तरच लोकांचा धर्मावरचा विश्वास वाढेल. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु कर्नाटकची जनता भाजपाचा हा कुटील हेतू समजते, असेही त्यांनी यावेळी येथे नमूद केले.

बजरंग दलावर बंदी घातल्यास बजरंग बलीचा अपमान होतो हा भाजपाचा आरोप धादांत खोटा आहे. भाजपाला राम, हनुमान किंवा कोणत्याही देवाबद्दल प्रेम नाही, भाजपा फक्तं देवाचा व धर्माचा आधार सत्तेसाठी वापर करतो. बजरंग दलाच्यावरुन आरडाओरड करणाऱ्या भाजपच्या दिवंगत मनोहर पर्रिकर सरकारनेच गोव्यात श्रीराम सेनेवर बंदी घातली होती, त्यावेळी रामाचा अपमान झाला असे वाटले नाही का? त्यामुळे भाजपासाठी देव हे फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच आहेत त्यांचे हे ढोंग जनतेला माहित आहे, भाजपाच्या या कांगाव्याला कोणी फसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील अंगोला येथील प्रचारा दरम्यान भाजपा पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गणपतीची मूर्ती भेट देत असताना मोदींनी गणपती मूर्ती हाताने बाजूला करत त्या कार्यकर्त्यालाही बाजूला सारून गणपतीचा अपमान केला, त्यावर भाजपा नेते का बोलत नाहीत? एकीकडे गणपतीचा अपमान करायचा व दुसरीकडे बजरंगबलीच्या नावाने गळे काढायचे हे भाजपाचे दुटप्पी धोरण नाही का? गणपतीचा अपमान केल्याबद्दल भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मी पुन्हा येईन..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो तसा पुन्हा आलो आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. पण पुन्हा आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्रपदावर आले. माझ्यासारखा असता तर खालच्या पदावर आलाच नसता असा खोचक टोला मारत कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार की नाही याची चिंता करण्याऐवजी फडणवीसांनी भाजपा कर्नाटकात सत्तेत येईल का? याची जास्त चिंता करावी,असा सल्लाही पटोले यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here