By Milind Mane

Twitter: @minindmane70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असताना या सोहळ्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी बेळगाव इथून आलेला ओंकार दीपक भिसे (२१) हा तरुण रायगड किल्ला चढत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू पावला. या तरुणाच्या मृत्यूमुळे शिवभक्तांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे

किल्ले रायगडवर जय्यत तयारी सुरू असताना विद्युत रोषणाईचे काम करणाऱ्या एका कामगाराला शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री किल्ल्यावर घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी पहाटे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम अनुभवण्यासाठी किल्ले रायगडावर पायी जात असताना बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील ओमकार या तरुणाला रायगडावर असणाऱ्या प्रचंड उष्णतेचा त्रास सहन न झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दोन घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे की नाही असा सवाल शिवभक्त विचारत आहेत. आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला असला तरी सहा तारखेला तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आजच्या पेक्षा लाखोंच्या संख्येने लोक येणार असल्याने त्यावेळेला अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा कोणती खबरदारी घेणार आहे? असा सवाल रायगडावर येणारे शिवभक्त विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here