By Milind Mane

Twitter: manemilind70

महाड: शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना खासदार सुनील तटकरे यांना या सोहळ्यात भाषण करण्याची संधी दिली नाही. तसेच भाषण करणाऱ्या अनेक मान्यवरांनी त्यांचे नाव घेण्याचे देखील टाळले. या कारणामुळे आपला अपमान होत असल्याने व प्रोटोकॉल पाळत नसल्याने खासदार सुनील तटकरे शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर टाकून निघून गेल्याची घटना आज किल्ले रायगडावर घडली.

ऐतिहासिक किल्ले रायगडवर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत होता. त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना भाषणाची संधी देणे गरजेचे असताना ती दिली गेली नाही. तसेच मान्यवरांनी त्यांचे नाव घेणेदेखील टाळल्याने खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून गडावरून काढता पाय घेतला आणि थेट गड उतरण्यास सूरवात केली.

या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. वेदमंत्रोपचारात अभिषेक सुरू होण्यापूर्वी खा. सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र, विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे हे या ठिकाणी दाखल झाले. वेद मंत्रोच्चारात सुरू झालेला अभिषेक समाप्ती होत आली असताना मुख्यमंत्री गडावर दाखल झाले.

मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर सुरवातीला आमदार भरत गोगावले यांचे भाषण झाले. त्यानंतर पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची भाषणे झाली. रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक व रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार सुनील तटकरे यांना मात्र भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. याशिवाय अनेक मान्यवर व्यक्ती आणि निवेदकानी त्यांचे नाव घेणे टाळले. हे खासदार सुनील तटकरे यांच्या लक्षात आले व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत राज्याभिषेक सोहळा अर्धवट सोडून तडकाफडकी गड सोडला. 

शिवराज्याभिषेक सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहिलेले खासदार सुनील तटकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय करिष्मा आहे. ते रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना भाषण करण्याची संधी देणे प्रोटोकॉल नुसार गरजेचे होते. मात्र तटकरे यांना भाषणाची संधी न देता शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान राजकारण केले नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मन्सूर देशमुख यांनी प्रशासनाला विचारला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडी येथील घरांना संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी 21 कोटी रुपयांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच केली होती. मात्र त्या निधीचा अजून एकही रुपया प्राप्त झालेला नाही. असे असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्याची घोषणा केली, मात्र हा निधी कधी प्राप्त होणार? असा सवाल मन्सूर देशमुख यांनी शासनाला विचारला आहे.

रायगड किल्ल्यावर झालेल्या या मानापमान नाट्यदरम्यान नेमके काय घडले, त्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी

खासदार तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना या कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here