By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या व महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा सहा मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत होणाऱ्या जाहीर प्रवेशाने रायगडातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जगताप यांचा प्रवेश आणि निवडणुकीने जिल्ह्यातील सात पैकी चार विधानसभा मतदारसंघात महिला राज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाडमधील चांदे क्रीडांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत स्नेहल जगताप, माणिकराव यांचे बंधू हनुमंत जगताप व महाड तालुक्यातील असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश करतील. यानंतर महाड विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात होणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघातून महिला राजची सुरुवात होणार असल्याने त्याचे लोण इतरत्र पसरेल. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाड, श्रीवर्धन, अलिबाग व पेण या चार विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत महिलाच उमेदवार असतील, असे संकेत रायगडच्या राजकारणातून प्राप्त होत आहेत.

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ व दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी केवळ अलिबाग विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई पाटील आणि त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे यांना महिला  आमदार होण्याचा मान मिळवला आहे. त्याच पद्धतीने महाड विधानसभा मतदारसंघात महिला उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान स्नेहल जगताप या मिळवणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर स्पष्ट होणार आहे.

रायगड जिल्ह्यातून सन 1995 ते २००४ आणि २००९ ते २०१४ अशा प्रकारे तीन वेळा शेतकरी कामगार पक्षाकडून मीनाक्षी प्रभाकर पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती सुनील तटकरे यांना महिला उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान प्राप्त झाला. रायगड जिल्ह्यातील पाटील व तटकरे या दोन महिला सोडल्यास आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात रायगड जिल्ह्यातील एकही महिला आमदार झालेली नाही.

सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाडमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्नेहल जगताप कामत या निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.

श्रीवर्धनमधून विद्यमान आमदार आदिती सुनील तटकरे याच उमेदवार असतील. त्याचबरोबर अलिबाग मतदारसंघातून चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र, पाटील घराण्यातील संदोपसूंदी पाहता माजी आमदार मीनाक्षी प्रभाकर पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील हे निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता आहे.

पेण विधानसभा मतदारसंघात रवीशेठ पाटील हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, शेतकरी कामगार पक्षातून भाजपात प्रवेश केलेले धैर्यशील पाटील हे भाजपाचेच रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील असे संकेत आहेत. त्यांच्या पत्नी नीलिमा धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व बांधकाम सभापती ही पद भूषवली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवार बदल झाला तर नीलिमा धैर्यशील पाटील या पेण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असू शकतील.

याचा अर्थ जिल्ह्यातील सातपैकी चार विधानसभा मतदारसंघात महिलाराज येण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाने होईल, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here