मंत्रालयातील जनता दरबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाले सहभागी

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांना बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची भुरळ पडली अन् मग हुन किम यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी होऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. लोकांमध्ये मिसळून काम करण्याची वृत्ती पाहून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुकही केले.

एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारसोबत शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयासाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी त्यांना या बैठकीत केले. या कामासाठी  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. 

ही बैठक पार पडल्यानंतर मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे हुन किम यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या समिती दालनात चर्चा करण्यासाठी बसले होते. काही वेळानंतर मुख्यमंत्री स्वतः तिथे त्यांच्या जनता दरबारासाठी आले. त्याचवेळी हुन हेदेखील तिथेच उपस्थित असल्याचे पाहून त्यांनी त्यांना देखील या जनता दरबाराचे काम कसे चालते ते पाहण्यासाठी आमंत्रित केले.

मुख्यमंत्री शिंदे हे दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर अभ्यागतांच्या भेटीगाठी घेतात. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक त्यांना भेटायला येतात. आज देखील असंख्य लोकं त्यांना भेटायला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनात आले होते. यातीलच एका अपंग व्यक्तीचे काम त्यांनी ताबडतोब करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचवेळी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम हेदेखील तिथेच उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने जाणून घेऊन त्यांची तिथल्या तिथे सोडवणूक करण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची पध्दत पाहून ते कमालीचे प्रभावित झाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे कौतुकही केले.

असे चालते जनता दरबाराचे कामकाज

मुख्यमंत्र्यांच्या या जनता दरबारात अनेक लोकं लांबून लांबून येतात. त्यांचे विषय समजावून घेत अधिकारी तातडीने त्यावर संबंधित विभागाचे शेरे मारून पुन्हा आलेल्या व्यक्तीकडे देतात. त्यानंतर मुख्यमंत्री आलेल्या व्यक्तीकडून तो विषय समजून घेत त्यावर तत्काळ स्वाक्षरी करतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी त्यांचे निवेदन स्वीकारून ते त्या त्या विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here