@maharashtracity

मुंबई: मुंबईतील कांदिवली भागातील हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी खासगीरित्या करण्यात आलेले लसीकरण हे बनावट असल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

या खासगी लसीकरणासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. संशयित लससाठा देखील अनधिकृत पद्धतीने मिळविण्यात आल्याचे आणि ३९० लोकांना १२६० रुपये याप्रमाणे लस विकत देण्यात येऊन ४ लाख ९१ हजार रुपये उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही रुग्णालयाशी लसीकरणाबाबत करारनामा न करता हे बनावट लसीकरण करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कांदिवली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कांदिवली येथील या बनावट लसीकरणाबाबत संशय व्यक्त होऊन पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर पोलीस व पालिका यंत्रणा कामाला लागली. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, ४८ तासात चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर उप आयुक्त (परिमंडळ ७) विश्वास शंकरवार यांनी वेळेत चौकशी पूर्ण करून आपला अहवाल सादर केला.

काय आहे नेमके प्रकरण

कांदिवली येथील हिरानंदानी या सोसायटीमध्ये ३० मे रोजी खासगी लोकांच्या मार्फत लसीकरण करण्यात आले. यावेळी, सोसायटीमधील ३९० लोकांना प्रत्येकी १२६० रुपये दराने लसीची मात्रा देण्यात आली.

यावेळी, लस देणार्यांनी लॅपटॉपचा वापर केला नाही. लस दिल्यावर लाभार्थी यांनी मागणी केल्यावर नेस्को, नानावटी, लाईफलाईन या रुग्णालयाच्या नावाने प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे लस घेतल्यावर एकही व्यक्तीला लसीचा शारीरिक त्रास झाला नाही. त्यामुळे लोकांना या लसीकरणाबाबत संशय निर्माण झाला. त्यातुनच कांदिवली पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली.

हे प्रकरण पालिकेकडे आले असता प्राथमिक चौकशीत ज्या रुग्णालयाच्या नावाने लोकांना प्रमाणपत्र देण्यात आली त्यांच्याशी कोणताही करार करण्यात आलेला नसल्याचे व पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे समोर आले.

एवढेच नव्हे तर हे बनावट लसीकरण करणाऱ्यांनी लोकांकडून प्रत्येकी १२६० रुपये याप्रमाणे ४ लाख ९१ हजार रुपयांचे घबाड जमा करून खिशात टाकल्याचे समोर आले.

अखेर बनावट लसीकरण उघडकीस

कांदिवलीतील या संशयास्पद लसीकरणाबाबतचा पालिका उप आयुक्त विश्वास शंकरवार यांनी ४८ तासांत चौकशी केली असता हिरानंदानी सोसायटीमध्ये महापालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता बनावट लसीकरण केल्याचे उघडकीस आले. या लसीकरणासाठी संशयित लससाठा देखील अनधिकृत पद्धतीने संशयितांनी मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

लसीकरण करणाऱया संबंधित लोकांकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती. ३९० नागरिकांना संशयित लस देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष १२० रहिवाशांनाच लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. तीन वेगवेगळ्या रुग्णालयांची नावे या प्रमाणपत्रांवर होती. मात्र या रुग्णालयांकडे करण्यात आलेल्या चौकशीनुसार, संबंधितांनी या रुग्णालयांशी कोणताही करारनामा केलेला नाही आणि या रुग्णालयांचा सदर लसीकरणाशी कोणताही संबंध नाही, हेही उघड झाले आहे.

एवढेच नव्हे तर लसीकरणाची प्रमाणपत्रे देण्यासाठी यूजर आयडी व पासवर्ड चोरुन बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आणि संशयित लससाठा अनधिकृत पद्धतीने मिळवल्याचे देखील समोर आले आहे.

तसेच सदर गृहनिर्माण संस्थेने लसीकरणासाठी पाळावयाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत मुंबई महापालिकेने ७ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचे पालन केलेले नव्हते. त्याचप्रमाणे, लसीकरणाच्या आयोजनासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी संबंधितांनी घेतलेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने त्या रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंडसंहितेनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यासह साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी ४ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here