पुणे
पुण्यातून वारंवार गुन्हेगारीच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मित्राच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीने स्मशानभूमीत जाऊन पूजा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्याजवळील सुरतापवाडी गावातील स्मशानभूमीत ही अघोरी पुजा करण्यात आली. मित्रासोबत झालेल्या व्यावसायिक वादातून व्यक्तीने ही पूजा केली. त्याचं नाव गणेश चौधरी असून तो अवैध सावकार आहे. त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्याच्या कुटुंबाचं वाईट व्हावं, म्हणून चौधरीने स्मशानभूमीत ही अघोरी पूजा घातली. दरम्यान गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर भागातील ससाणे नगरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली भोंदूबाबा तरुणाने 18 लाख रुपये घेऊन पळ काढल्याची घटना घडली. या भोंदूबाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली होती. पूजा सुरू असतना तिथे आलेल्या तोतया पोलिसांनी 18 लाखांची रक्कम ताब्यात घेतली आणि भोंदूबाबासह विनोद परदेशी यांना मारहाण केली. त्यानंतर तोतया पोलिसांनी 18 लाख रुपये घेऊन पळ काढला.