Twitter : @milindmane70

महाड

महाड शहरातील अनेक भागात गेल्या दोन वर्षापासून अवैध जुगार अड्डे बोकाळले आहेत. यातील सुकटगल्ली भागात जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत रोख रकमेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले. जुगार अड्ड्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

महाड शहरात मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी व इतर बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये पोलिसांच्या दुटप्पी वागणुकीच्या निषेधार्थ प्रचंड रोष निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच हे धंदे तत्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. 

महाड शहरातील बेकायदेशीर धंदेवाल्यांना सध्या चांगलाच चाप बसला होता. परंतु आजही हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. यातील सुकट गल्ली भागात चोरीछुपे मटका अड्डे सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार शहरातील सुकटगल्ली भागात बेकायदेशीर सुरू असलेल्या सोरट पद्धतीच्या या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करून पोलिसांनी मनोज महादेव दाखिनकर, निलेश विलास शिंदे व सुनील संतोष चव्हाण या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ च्या कलम १२अ नुसार कारवाई केली आहे.

महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. परंतु जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई यापुढे देखील अशीच चालू राहावी, अशी मागणी महाड शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here