Twitter : @milindmane70

महाड

महाड तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये गो हत्या करून बेकायदेशीर गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. या दरम्यान आरोपी आणि गोरक्षक यांच्यामध्ये बाचाबाची आणि मारहाण झाली. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षक तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

राजेवाडी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर गो हत्या करून गोमांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गोरक्षकांनी आरोपींना मारहाण केली. त्यामुळे आरोपींसह अन्य लोकांनी या गोरक्षकांवर हल्ला चढवला. रिहान रशीद आलेकर, रहमान अब्दुल करीम पालेकर, फरहान अब्दुल करीम पालेकर अशी तीन आरोपांची नावे आहेत.

राजेवाडी गावामध्ये झालेल्या या घटनेचे वृत्त महाड शहर व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखे पसरताच महाड शहर पोलीस ठाण्यात गर्दी जमण्यास सुरुवात झाली. महाड पोलीस ठाण्यात गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेचे आवाहन केले. मात्र पोलीस जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने अखेर महाड शहर पोलिसांनी जमलेल्या जमावावर लाठीहल्ला केला, त्यामुळे शांततेत जमलेला जमाव अखेर संतप्त झाला. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष चेतन पोटफोडे व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने ते आजच्या या गोवंश हत्या प्रकरणात हिंदू रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांसोबत असल्याने पोलिसांनी या दोघांविरोधात दंगल सदृश्य परिस्थिती घडवण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होत आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून मारहाणीचा तर गोरक्षकांकडून देखील मारहाणीची परस्पर विरोधी तक्रार दाखल केली गेली. तसेच पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीतून पोलिसांवर धावून गेल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.

शांतता राखण्याचे आवाहन!

महाडजवळील राजेवाडी गावामध्ये अवैध्यरित्या गो हत्या आणि गोमांस होत असल्याच्या तक्रारीनंतर महाड शहर पोलीस ठाण्याबाहेर गोरक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याबाहेर तणाव निर्माण झाला. महाड पोलीस उपविभागीय अधिकारी एस.बी. काळे यांनी पोलिसांना पोलिसांचे काम करू द्या, शांतता राखा, असे आवाहन केले. याप्रकरणी नागरिकांनी शांतता राखली पाहिजे. समाज माध्यमावर येणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

याप्रकरणी विविध चार गुन्हे दाखल झाले असून मूळ गुन्ह्यामध्ये असलेल्या तीन आरोपीं विरोधात भादवि कलम 353  तसेच प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वीस ते पंचवीस गोरक्षकांनी मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यासमोर पोलिसांवर धावून गेल्याप्रकरणी दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here