संग्रही ठेवण्याबरोबर देशभक्तीच्या प्रचारकार्यासाठीदेखील उपयुक्त लिखाण

@maharashtracity

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघर्षामुळेच. यात प्रामुख्याने लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्रेरणा आणि कृतिशीलतेमुळे ब्रिटिश सत्तेला हादरे बसत होते आणि त्यातूनच हतबल होऊन ते हा देश सोडून गेले. वास्तविक ही बाब नंतरच्या काळात इतिहासकारांनी अधिक प्रभावीपणे जनतेपुढे आणली नाही. त्यामुळेच सत्याग्रह आणि अहिंसेने स्वातंत्र्य मिळाल्याची कल्पना रुढ होत गेली. त्याचा वारंवार उच्चार होऊन हेच सत्य लोक समजू लागले. हाच वारंवार उच्चार कसा प्रभाव पाडतो आणि खरे स्वातंत्र्य क्रांतिकारक आणि सैनिकांच्या संघर्षातून मिळाले, त्यांचे यशोगीत आपण गायले पाहिजे, याचा आग्रह करणारे `यशोगीत सैनिकांचे १८५७ ते १९४७’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. क्रांतिकारक घराण्याची सून असलेल्या स्वामिनी विक्रम सावरकर यांनी ते लिहिले आहे. त्यामुळेच त्याचे महत्व विशेष आहे. क्रांतिकार्याला अगदी जवळून पाहिल्याचा तसेच त्यात होरपळलेल्या तरीही देशसेवेचे अखंड व्रत आयुष्यभर करणा-या घराण्यातील हा वारसा निश्चितपणे वाचकांना हा विचार समजून घेण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे.

मंदिरात प्रवेश कऱण्यापूर्वी या शीर्षकाने पुस्तकातील प्रकरणांचा प्रारंभ होतो. अर्थातच यातील विचार हे प्रत्येक देशभक्तांसाठी एका मंदिरातील प्रवचन अथवा प्रबोधन ऐकल्यासारखेच आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच एका पवित्र भावनेतून आपण त्याच्या वाचनाकडे वळतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार तसेच आपल्या भारतीय भूमीचा पराक्रमाचा पूर्वेतिहास, त्यात स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचे संक्षिप्त कार्य, पुढे क्रांतिप्रयत्न,  अंदमान पर्व, तरुणांना सैन्यात शिरण्याचा संदेश, त्यातून स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी सैन्यबळ उभे करण्याचा प्रयत्न, सावरकरांवरील बंधने, त्यांचे समाजसुधारणेतून देश आणि क्रांतिकार्य, हिंदुसंघटन अशा बाबींवर आधारित मजकूर या पुस्तकात आहे. त्याशिवाय धुळ्याचे समर्थहृदय शंकरराव उपाख्य नानासाहेब देव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १८३८ मधील भेट तसेच धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांचा सैन्यभरतीतील सहभाग अशी अज्ञात माहितीदेखील या पुस्तकात आढळते. त्यामुळे त्याचे वेगळेपण आहे.

लेखिकेने ही माहिती आटोपशीर स्वरुपात देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अधिक तपशीलातदेखील हा मजकूर लिहिला असता तर उत्तमच. कारण अशा वेगळ्या पैलूंवर आजकाल फारच कमी ऐतिहासिक साहित्य प्रकाशित होत असते. पराक्रमाचा पूर्वेतिहास सांगताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि नंतर स्वातंत्र्यसंग्रामातील यौद्ध्यांची माहिती दिली आहे. वास्तविक मधल्या कालखंडातील यौद्धे आणि पराक्रमी राजे यांच्याविषयी लिहता आले असते. ओझरता उल्लेख आढळतो तो विक्रमादित्य आणि शालिवाहन राजांचा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याचा धसका ते कारागृहात असतानाही देखील ब्रिटिशांनी घेतला होता. तसा उल्लेख गुप्तचर खात्याच्या अहवालात आहे. म्हणूनच त्यांची सुटका जाणीवपूर्वक केली नाही, या त्यांच्या क्रांतिकार्याचा उल्लेख आला असता तर वाचकांनाही त्याबाबत आकलन झाले असते.

असे असले तरी या पुस्तकावर लेखिकेने बरेच संशोधन केले आहे. यात या विषयातील अभ्यासक अरुण बक्षी आणि अनुराधा खोत यांचेही त्यांना सहकार्य मिळाले आहे. शिवाय विकास रामचंद्र फडके यांनी समर्पक मुखपृष्ठ केल्यामुळे ते अधिक आकर्षक झाले आहे. कृष्णा प्रकाशनचे विद्याधर ठाणेकर यांनी हे पुस्तक प्रकाशित करून मोलाचे कार्य केले आहे. हे पुस्तक हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाले तर त्याची व्याप्ती वाढेल, अधिकाधिक तरुण देशभक्तांना मार्गदर्शन होईल. संग्रही ठेवण्याबरोबर देशभक्तीच्या प्रचारकार्यासाठीदेखील उपयुक्त असे हे लिखाण आहे.

–              अशोक शिंदे (भ्रमणध्वनी  ९८२१३७४६२६)

शीर्षक – `यशोगीत सैनिकांचे १८५७ ते १९४७’

लेखिका – श्रीमती स्वामिनी विक्रम सावरकर

प्रकाशक – विद्याधर ठाणेकर, कृष्णा प्रकाशन, ठाणे (भ्रमणध्वनी  ९८२१५६१३४४)

पृष्ठ – ९६ किंमत १३० रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here