X: @maharashtracity

मुंबई: दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्यावतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायन कार्यक्रम रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आयोजित केला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर यती भागवत तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. 

आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरविणाऱ्या पंडिता आरती अंकलीकर स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवितात. बंदिशीची मांडणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे. स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने रचना यांवर त्या भर देतात. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती, अचूक, तयारीची लयकारी या गायकीत आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचे वैविध्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे. या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्यालाइतकीच ठुमरीही रंगविणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत. त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल यश प्राप्त केले आहे. त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर व पं. दिनकर कायकिणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली. अधिक माहितीसाठी ०२२-२४३०४१५० येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here