X : @milindmane70

महाड: महाड तालुक्यातील फौजी अंबावडे गावाजवळील खिंडवाडी धरणामध्ये असलेल्या मगरीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शिरवली गावाजवळ धरणाचे बॅक वॉटर असून या ठिकाणी या मगरीचे वास्तव्य दिसून आल्याने शिरवली गाव आणि मोहल्ला परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

शिरवली गावाजवळ खिंडवाडी धरणाचा काही भाग आहे. या धरणाच्या काठावरच शिरवली मोहल्ला आणि गाव वसलेले आहे. या गावातील नागरिकांचे याठिकाणी सातत्याने ये – जा सुरू असते. दैनंदिन वापरासाठी पाण्याचा वापर देखील येथूनच होतो. पाळीव जनावरे देखील याच धरणाच्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी जात असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी असलेल्या मगरीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पाणी पिण्यास जाणाऱ्या कुत्र्यांना या मगरीने लक्ष केले असून आतापर्यंत पाच ते सहा कुत्रे या मगरीने फस्त केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

खिंडवाडी धरणाजवळ दुपारच्या सुमारास ही मगर तोंडाचा जबडा उघडून काठावर बसलेली असते. याच सुमारास कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, पाणी पिण्यासाठी जाणारी पाळीव जनावरे यांचा वावर असतो. मात्र मगर दिसू लागल्याने या नागरिकांनी धास्ती घेतली आहे. सुमारे तीन ते चार फुट लांबीची ही मगर असून या मगरीला ताब्यात घेऊन तिला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मागील काही महिने ही मगर खिंडवाडी धरणाजवळील बॅक वॉटर असणाऱ्या शिरवली गावाजवळ दिसून येत आहे. महाड वनविभागाने या मगरीला पकडून सुरक्षित स्थळी सोडून द्यावी, अशी मागणी या गावातील नागरिक- युसूफ पोशिलकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here