शिडवणे चे संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये यांचे गीत

सोशल मीडियावर गाजतेय गोमू

By निकेत पावसकर 

सिंधुदुर्ग (तळेरे): कोकणातील प्रसिध्द आणि चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शिमगोत्सवावर आधारित ” गोमू ” या गीताला सध्या द्रौपदी क्रिएशन या युट्युब चॅनलवर रसिकांचा अक्षरशः उदंड प्रतिसाद मिळत आहे. कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील प्रणय शेट्ये हे या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत. 

याबाबत माहिती देताना गीतकार, संगीतकार प्रणय शेट्ये म्हणाले की, कोकणातील शिमगा म्हटला कि गोमूचा नाच डोळ्यासमोर येतो. अतिशय लोकप्रिय लोककलाप्रकार म्हणजे कोकणच्या लाल मातीमधील स्वैर सांस्कृतिक सौंदर्य अलंकार शिमगोत्सव. या मातीत अनेक मनस्वी कलाप्रकार रुजलेले आणि यामधून फुलणारे नामवंत कलाकारही तेवढेच लोकप्रिय झाले. कलाकार हा अत्यंत भावनिक असतो आणि त्याची कलाहि तो उपासक म्हणून कायम राहण्यासाठी नेहमीच आग्रही असतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कितीही वादळ आली तरीही कलेच्या वेड्या प्रेमापोटी अनेक चांगल्या – वाईट अनुभवांचं गाठोडं घेऊन आनंदाने वाटचाल करीत राहतो. एकंदर ही कला प्रेक्षकांसाठी रंजक असली तरी ती कायम उत्तमरितीने साकारण्यासाठी एक वेगळीच तारेवरची कसरत नेहमीच सर्व कलाप्रेमींची पाहायला मिळते.

कोकणच्या उत्सवपूर्ण वातावरणात गेल्या अनेक पिढ्या शिमग्यातील गोमू प्रत्येक गावात, दारोदारी जाऊन फेर धरताना दिसते. या लोककलाप्रकारासाठी अनेक अज्ञात कलाकारांचे योगदान आणि तेवढाच त्यांचा संघर्ष ही महत्वपूर्ण आहे आणि नेमकं हेच मांडण्याचा प्रयत्न लवकरच रंगभूमीवर येणाऱ्या मालवणी नाटकाच्या प्रसंगातून कणकवली तालुक्यातील नाटळ येथील प्रसिद्ध विनोदि नाट्य लेखक वैभव अर्जुन परब यांनी आपल्या दोन अंकी मालवणी नाटकातून केला आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात दंग अशी गोमू ही लोकपरंपरा आणि ही कला साकारणारे अनेक कलाकार, त्यांच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष आपल्या विशेष विनोदी शैलीतून रुजवत, लेखकाने यामधील सर्वच पात्राची एकमेकांसाठीची आपुलकी, जिव्हाळा आणि भावनिक गुंतागुंत अत्यंत हळुवारपणे अनेक नाट्य प्रसंगातून साकारले आहेत. शिमग्यातील गोमू… आणि ती साकारणारे कलाकार, त्यांचे हितचिंतक यांची त्याच्या आयुष्यात घडणारी फरफट उलघडणाऱ्या एका सर्वांगीण नाट्यनिर्मितीची धुरा मालवण गावचे सुपुत्र ‘उगम एंटरटेनमेंट’ चे दिनेश चव्हाण या निर्मात्याने हाती घेतली आहे. 

सध्या या नाटकाचे शीर्षक गीत गोमू अतिशय लोकप्रसिद्ध होत आहे. प्रणय शेट्ये या तरुण आणि उमेदीच्या संगीतकाराने स्वतःच्या विशेष शैलीने लिहून, कोकणी माणसाच्या मनाचा ठाव घेत आणि त्याची आवड लक्षात घेऊन संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध आणि सर्व लोकप्रिय पार्श्व गायक नागेश मोरवेकर यांनी आपल्या विशेष लाघवी स्वभाव शैलीतून हे गाणं गायले आहे आणि म्हणूनच सर्व संगीतप्रिय प्रेक्षकांची लक्षणीय पसंती द्रौपदी क्रिएशन या युट्युब चॅनेल वरून प्रसिद्धीस आलेल्या गोमू…गोमू..गोमू ..गोमू ..गोमू… या मालवणी गाण्यासाठी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 

शिमग्याचा…गोमूचा …पारंपरिक वारसा जपणारे हे गीत प्रसारित झाल्यापासून कोकणच्या मातीत अस्सल कोकणी पसंतीने रुजलेलं हे  गीत, नाटक आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वाना ही शिमग्याची सांगीतिक मेजवानी कायम राहील, अशी  निर्माते यांना आशा आहे आणि गोमू ..गोमू …ची  नाट्यमयी गिरकी या गाण्याच्या माध्यमातून कोकणच्या गावागावातून नेहमीच  गर..गर..फिरून सर्व कलाकारांवर प्रेक्षकांचे  प्रेम अबाधित करील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here