@maharashtracity

रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम श्वेता खरातने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे.‌ श्वेतासोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका स्नेहा महाडीक हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे संगीतकार संगम भगत हे आहेत. तर हे गाणं मनाली घरात हिने लिहीले आहे.  ‘झिम्माड’ गाण्याचे दिग्दर्शन अक्षय पाटील यांनी केले आहे. तर या गाण्याच्या निर्मात्या काजल हिवाळे या आहेत.

अभिनेत्री श्वेता खरात झिम्माड गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “जेव्हा पहिल्यांदा अक्षयने मला हे गाणं ऐकवलं त्याक्षणी मी गाण्याच्या प्रेमात पडले. मी या गाण्यासाठी लगेच होकार दिला. हे गाणं चिपळूणमध्ये चित्रीत झालं आहे. गाण्यातील लोकेशन्स डोळ्यांचं पारणं फिटवणारे आहेत. टिम फार कमाल होती. गाणं चित्रित करताना खूप धमाल आली. तुम्ही विश्वास ठेवणारं नाही, पण कुठेही धावपळ न होता, या गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पार पडले आहे. “

पुढे ती एका चित्रीकरणाचा किस्सा सांगते, “आम्ही एका धबधब्यापाशी गाण्याचं शूट करत होतो. तो अक्राळविक्राळ धबधबा डोंगराच्या कपारीत होता. जिथे माणसांची वर्दळ नव्हती. खूपच मोठा धबधबा होता तो. मी सुरूवातीला तिथे जाण्यासाठी घाबरत होते. पण टिमने माझी संपूर्ण काळजी घेतली. माझ्यासोबत गाण्यात एक ज्येष्ठा नावाची लहान मुलगी काम करतेय, ती सुद्धा माझ्यासोबत शूटिंग लोकेशनवर आली होती. आम्हाला गाण्याच्या लीरीक्सवर नृत्य करायचं होतं, पण, धबधब्याचा आवाज इतका मोठा होता की गाणंच ऐकू येतं नव्हतं. तेव्हा संगीतकार संगम भगतने आमच्यासाठी तिथे गाणं गायलं आणि आम्ही दोघींनी नृत्य केलं. गाणं फार कमाल झालयं, तुम्ही नक्की हे गाणं बघा आणि या गाण्याला भरभरून प्रेम द्या.”

या गाण्याचे दिग्दर्शक अक्षय पाटील गाण्याविषयी सांगतात, “मी गेली पाच वर्ष संगीतक्षेत्रात काम करीत आहे. आत्तापर्यंत मी बरेचसे म्युझिक अल्बम केले आहेत. साजणी, गोजिरी, मन माझे, माझी पंढरी, चांदण रातीला, दर्या राजा या गाण्यांचे मी दिग्दर्शन केले आहे आणि आता झिम्माड हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं चित्रीकरण आम्ही चिपळूण येथे केलं आहे. आम्ही चित्रीकरणाचे लोकेशन्स शोधले आणि ते अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून या गाण्यावर काम करतोय.”

पुढे ते सांगतात, “अभिनेत्री श्वेता खरातने अप्रतिम असं काम या गाण्यात केलं आहे. सेटवर सर्वात जास्त उत्साही जर कोण असेल तर ती श्वेता होती. अभिनेत्री श्वेता खरात आणि गायिका ‘स्नेहा महाडीक’ यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम केलं आहे. दोघीही फार मेहनती आहेत. या गाण्यात दोघींनी इतकं अप्रतिम काम केलं आहे की तुम्ही हे गाणं वारंवार पहालं याची मला खात्री आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. असचं प्रेम कायम असू द्या‌.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here