Twitter : @maharashtracity

मुंबई

यंद संच मान्यतेला स्थगित देत १५ जूनपर्यंत आधार अपडेट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून नव्याने संचमान्यता द्यावी, अशी मागणी शिक्षक वर्गातून जोर धरु लागली आहे. तसे निवेदन शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण आयुक्त तसेच संचालकांना देण्यात आले असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या संचमान्यता शाळांना वितरित केल्या असून संचमान्यतेच्या आधारावर शाळांमधील अतिरिक्त व रिक्त जागांची माहिती शिक्षण विभागाकडे कळविण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. या संचमान्यततेत ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पटावर असलेले विद्यार्थी ग्राह्य धरले आहेत. राज्यात विद्यार्थ्यांचे आधार अपडेशनचे काम सुरू होते. यातही अनेक विद्यार्थ्यांच्या आधारची पडताळणी न झाल्याने असे हजारो विद्यार्थी या संचमान्यतेत ग्राह्य धरले नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. मुंबईत अतिरिक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. शाळांनी १५ जूनपर्यंत आधार अपडेशन केल्याने या हजारो विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा व सद्यस्थितीत असलेली संचमान्यता स्थगित करून १५ जुनची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून नव्याने संचमान्यता देण्यात यावी, तोपर्यंत मुंबई व राज्यातील इतर कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here