Twitter : @milindmane70

मुंबई

राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्यसेवा म्हणजेच 108 रुग्णवाहिका सेवा ही सन 2014 पासून राज्य सरकारने बीव्हीजी (भारत विकास ग्रुप) कंपनीच्या करारनाम्यावर सुरू केली. मात्र, या रुग्णवाहिकेतील चालकांना कमी वेतनावर राबवण्याच्या बीव्हीजी कंपनीच्या विरोधात राज्यभरातील 1000 रुग्णवाहिका चालकांनी एक सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाण्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एकाच दिवशी रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना राज्यभरातील गोरगरीब रुग्णांना मोफत व 24 तास रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या रुग्णवाहिकाच्या चालकांना मागील नऊ वर्षापासून अल्प वेतनात राबविण्याचे काम बीव्हीजी कंपनी व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप करत वाढत्या महागाईला कंटाळून या रुग्णवाहिकेच्या चालकांनी अखेर एक सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत विकास ग्रुप म्हणजेच

बीव्हीजी कंपनी व्यवस्थापन रुग्णवाहिकेच्या चालकांना अल्प मोबदला देऊन राज्यभरातील 1000 रुग्णवाहिकेच्या चालकांना वेठीस धरण्याचा प्रकार पहिल्या वर्षापासून करीत आहे. याबाबत अनेक वेळा बीव्हीजी कंपनी व्यवस्थापनासोबत रुग्णवाहिका चालक संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. मात्र, वेळोवेळी चालढकलपणा करण्याचे काम बीव्हीजी कंपनी व्यवस्थापन करीत आले आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत 25 जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संचालक, प्रशासकीय अधिकारी व वाहन चालक संघटना यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत बैठक घेऊन चालकांच्या मागण्यांबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी देखील कंपनी व्यवस्थापनाने चालकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही आणि चालकांसोबत कोणतीही चर्चा करण्यास तयार नाही. यामुळे राज्यभरातील 108 रुग्णवाहिकेचे चालक संतप्त झाले आहेत.

राज्यात सन 2014 मध्ये सुरू झालेली 108 ही रुग्णवाहिका सेवा सुरुवातीला 35 किलोमीटर वरील कॉल घेईल, असा नियम ठरला होता. मात्र आता ही अट काढून शंभर किलोमीटर वरील सुद्धा कॉल घेण्याची अट घालण्यात आली आहे. सन 2014 ते 2022 या कालावधीत 81 लाख 52 हजार 181 नागरिकांना 108 रुग्णसेविकेचा लाभ झाला होता. तसेच आत्तापर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासात या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे किमान 85 लाखाहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

राज्यभरातील 108 रुग्णवाहिका सेवेमुळे आजपर्यंत चाळीस हजाराच्या आसपास गरोदर मातांनी रुग्णवाहिकेमध्येच बाळाला जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालय व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, उपजिल्हा रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयापर्यंत संगळ्याकडेच असणाऱ्या रुग्णवाहिका या शासकीय नियमाप्रमाणे तीन लाख किलोमीटरपर्यंत चालवल्या जाऊ शकतात. मात्र, दहा वर्षात 108 रुग्णवाहिका सेवेतील असंख्य जुन्या झाल्या असून त्यांचा वापर पाच लाख किलोमीटर अंतरापर्यंत झाला आहे. अनेक वेळा या रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडलेल्या देखील पाहण्यास मिळतात.

राज्यभरातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी वरदान ठरलेली 108 रुग्णवाहिका सेवा चालू ठेवायची असल्यास ज्याप्रमाणे राज्यभरातील विधानसभा सदस्यांना नवीन वाहने देण्यासाठी शासन तत्परता दाखवते, त्याप्रमाणे मागील दहा वर्षात किती जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका दिल्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वी 108 नंबर ला कॉल केल्यावर 15 ते 20 मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध व्हायची. मात्र, आता रिस्पॉन्स टाईम वाढला असून याला कारण जुन्या रुग्णवाहिका वारंवार बंद पडणे हे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाकिमान दोन ते तीन तास रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेसाठी वाट बघावी लागत आहे.

राज्यभरात राज्य सरकारच्या मदतीने 1000 रुग्णवाहिका कार्यरत आहे. मात्र ज्या भारत विकास ग्रुप म्हणजे बीव्हीजी या खाजगी कंपनीला हा प्रकल्प चालवायला दिला आहे, ती कंपनी चालकांना अल्प वेतनावर वेठीस धरत असल्याने या चालकांचा प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास ऐन सणासुदीच्या काळात 108 रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here