Twitter :@milindmane70

मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्री किनारी आढळलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल, सागरी पोलीस दल सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यावरून सीमा शुल्क विभागाने बंद प्लास्टिक पिशवीत असणारे 250 किलोहून अधिक अमली पदार्थांचे पाकीट 14 ते 17 ऑगस्टदरम्यान ताब्यात घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील सागरी किनाऱ्यावर अमली पदार्थांची तस्करी होते की काय? या शंकेने राज्य पोलीस दलासहित तटरक्षक दल व सागरी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करडे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुडी, दाभोळ आणि बोरिया या समुद्रकिनाऱ्यावर 14 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान समुद्रातून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकबंद असलेली पाकिटे वाहून आल्याचे निदर्शनास आले. तपासाअंती ही पाकिटे अमली पदार्थांचीच असल्याचे निष्पन्न झाले. ही पाकिटे परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील असा संशय सीमा शुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेली 10 प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅकबंद असलेली संशयास्पद पाकिटे ही बारा किलोची वजनाची होती, त्यामध्ये चरस हे अमली पदार्थ असल्याचा निष्पन्न झाले आहे. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने केळशी ते बोरिया या समुद्रकिनारी शोध मोहीम सुरू केली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी करडे ते लाडघर या समुद्रकिनारी 35 किलो चरस असलेली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकबंद असलेली पाकिटे आढळली. तर 16 ऑगस्ट रोजी केळशी समुद्रकिनाऱ्यावर 25 किलो आणि कोलथरे समुद्रकिनाऱ्यावर 13 किलो अमली पदार्थांची पाकिटे आढळली. 17 ऑगस्ट रोजी मुरुड येथे 14 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांची पाकिटे आढळली. त्याच दरम्यान बुरुंडी ते दाभोळ या खाडीदरम्यान 101 किलो तर बोरिया येथून 22 किलो अमली पदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याच दरम्यान कोलथरे समुद्रकिनाऱ्याच्या खडकाळ भागात देखील मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची पाकिटे आढळून आली.

दापोली येथील सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “आम्ही पूर्ण समुद्रकिनाऱ्यावर शोध मोहीम राबवण्याचे काम सुरू केले आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या स्थानिक लोकांनी संशयास्पद अमली पदार्थ युक्त पाकिटे आढळल्यास सीमा शुल्क विभागाकडे संपर्क करावा, अमली पदार्थ बाळगणाऱ्याला दहा वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होत असल्याने नागरिकांनी अमली पदार्थ बाळगू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मागील वर्षी 2022 मध्ये गुजरात मधील पोरबंदर व जुनागड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर 59 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेले ड्रग्ज समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले होते. त्या प्रत्येक पॅकेटचे वजन सुमारे एक किलो होते.

एकंदरीत रायगड, रत्नागिरी, पालघर व ठाणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून समुद्रकिनाऱ्यावरील जागांची पाहणी करण्यास संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. अमली पदार्थांची तस्करी पुन्हा एकदा चालू झाली की काय असा प्रश्न कोकणातील जनतेला पडला असून अमली पदार्थांच्या तस्करीमुळे कोकणातील सागरी किनाऱ्यावरील नागरिकांना या अमली पदार्थांच्या तस्करांमुळे बदनाम करण्याचे कारस्थान चालू झाले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या या सीलबंद पाकिटांमुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या कारणामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here