Twitter : @maharashtracity
ठाणे
आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या नाही तर पालकाच्या भूमिकेत आहात, त्यामुळे चांगले पालक बना. आपल्या मुलांना स्वतंत्र विचार करू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा. विचारांचा वाद झाला तरी चालेल पण त्यांच्याशी संवाद राहू द्या. मुलांनी आपल्याशी मनातले बोललेच पाहिजे, असे विश्वासाचे नाते निर्माण करा. त्यांना मार्ग दाखवा, दिशा दाखवा, पण त्याचे त्याला दडपण वाटेल असे वागू नका, त्यांचे दोस्त व्हा अशा शब्दात आपल्या माजी विद्यार्थ्यांना पालकत्वाचे धडे देत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मेघना मेहेंदळे आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आठवणींत रमून गेल्या.
ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या 1984 ते 2005 वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्यदिनीच जन्मलेल्या निवृत्त उपप्राचार्य प्रा. मेघना मेहेंदळे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन ठाण्यातील स्व. दादा कोंडके अॅम्फिथिएटर येथे केले होते.
अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय सोपा करून सहजपणे उलगडणार्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका, कुशल प्रशासक, भारतीय महिला फेडरेशन ठाणे समितीच्या अध्यक्ष म्हणून महिलांच्या न्याय व हक्कासाठी सजग असणाऱ्या चळवळीच्या प्रणेत्या, शासनाच्या बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीश, महिला मुले व ज्येष्ठ नागरिकांचा आधारवड असलेल्या निस्सीम समाजसेविका अशा विविध अंगांनी समृद्ध असणाऱ्या प्रा. मेघना माधव मेहेंदळे यांच्या संपन्न कारकिर्दीचा त्यांच्या वयाचा अमृत महोत्सव साजरा होता गौरव करण्याचे ज्ञानसाधना महाविद्यालयातील 1984 पासूनच्या विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ठरवले आणि या कार्यक्रमाचे उस्फुर्त आयोजन करीत गुरुदक्षिणा दिली.
समाजात सध्या महिला, मुलींसाठी चांगले वातावरण दिसत नाही. अशावेळी मुलींना शहाणे व धीट बनवून, धोके दाखवून देत परिस्थितीतला तोंड देण्याचे सामर्थ्य पालकांनी त्यांच्या मनात निर्माण करावे असा संदेश प्रा. मेघना मेहंदळे यांनी दिला. स्त्रीची ताकद खूप मोठी असते. ती मुलींच्या लक्षात आणून द्या आणि स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला द्यावी असे सांगत त्यांनी अनेक प्रसंग कथन करीत ज्ञानसाधना महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी त्यांचा जीवनपट उलगडणारा ‘कृतीशील सेवाव्रती’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी 76 अंक स्वरूपातील उजळणाऱ्या दिव्यांनी त्यांचे औक्षण केले. माजी नगरसेवक तथा विद्यार्थी संजय तरे, अॅड. अनुराधा परदेशी आणि सर्व विद्यार्थी समुहाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सुप्रसिद्ध निवेदक मकरंद जोशी यांनी केले.
महेंद्र कोंडे यांनी नेटके सूत्रसंचालन आणि एकनाथ पवळे यांनी आभार प्रदर्शन केलेल्या या अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी महेंद्र म्हस्के, एकनाथ पवळे, प्रिती पाटील, सीमा कोंडे, योगिता कारखानीस, संतोष पांडव, संतोष धुरी, रविंद्र करमरकर, अजय कांबळे, प्रतिज्ञा शिंदे, अनिल कदम, सचिन पाटील, सविता कु-हे, सरिता जाधव, अजित देशमुख, रमेश सांडभोर या माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडली. माजी विद्यार्थी मोहनीश कळसकर आणि सुनिता सूर्यवंशी यांनी बहारदार गीते सादर करत कार्यक्रमात स्वररंग भरले.
ज्ञानसाधनाच्या 22 वर्षाच्या अध्यापन कारकिर्दीतील सर्व बॅचेसमधील मुलामुलींनी एकत्र येत माझ्या अभिष्टचिंतनासाठी आयोजित केलेला हा सोहळा अत्यंत सुखावह असा धक्का असून सेवानिवृत्तीनंतर 18 वर्षांनीही विद्यार्थी आपल्याला विसरलेले नाहीत हा माझ्यासाठी अविस्मरणीय आणि अनमोल ठेवा आहे अशा शब्दांत प्रा. मेघना मेहेंदळे यांनी भावना व्यक्त केल्या.