Twitter : @milindmane70

मुंबई

रायगड जिल्ह्यातील इरसाळवाडी या गावात दरड कोसळून झालेल्या घटनेनंतर राज्य शासन जागे झाले असले तरी धोकादायक व भूस्खलन होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यातील 61 आदिवासी वाड्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी शासनाकडे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी माळीण येथे दरड कोसळून दुर्घटना घडली, त्याचीच पुनरावृत्ती जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात १९/०७/२०२३ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दुर्गम डोंगराळ भागात असलेली इर्शाळवाडी ठाकूरवाडी या आदिवासी वाडीत घडली. ता दुर्घटनेत 27 लोक मृत पावले तर 57 आदिवासी बांधव बेपत्ता झाले. 144 लोक जिवंत असले तरी या दुर्घटनेने हे आदिवासी बांधव मानसिक दृष्ट्या खचले आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे कविता निरगुडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी वाड्यांवर दळणवळण व इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. म्हणून माळीण व इर्शाळवाडी येथील दुर्घटनांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अतिसंवेदशील अशा वाड्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 20, खालापूर तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील 11 व पनवेल तालुक्यातील ४ आदिवासी वाड्या या दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. या ठिकाणी कधीही भूस्खलन होऊन दरड कोसळू शकते, म्हणून दुर्गम व डोंगराळ भागातील या आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी राज्यपाल रमेश बैस व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा व पनवेल या तालुक्यातील धोकादायक आदिवासी वाड्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ) कर्जत तालुका:- १) सागाचीवाडी, २) तुंगी, ३) बेकरेवाडी, ४) आसलवाडी, ५) नाण्यांचा माळ, ६) धनगरवाडी, ७) धामणदांड, ८) बोरीचीवाडी, ९) भूतीवलीवाडी, १०) चिंचवाडी, ११) आषाणे ठाकूरवाडी, १२) किरवलीवाडी, १३) पाली ठाकूरवाडी, १४) ममदापूर ठाकूरवाडी, १५) बेडीसगाव (वरचे शिवले), १६) टाकाची वाडी (भडवळ), १७) सावरगाव ठाकूरवाडी, १८) ममदापूरवाडी, १९) पळसदरी ठाकूरवाडी, २०) ढाकवाडी

ब) खालापूर तालुका:- १) इर्शाळ ठाकूरवाडी, २) हास्याचीपट्टी (माथेरान), ३) काटवन, ४) चांगवाडी, ५) गारबट, ६) उंबरवीरा, ७) माडप ठाकूरवाडी (मुठा), ८) मिल ठाकुरवाडी खोपोली, ९) रठीचामाळ ठाकूरवाडी (चिंबोड), १०) कुंभिवली ठाकुरवाडी, ११) आरकसवाडी, १२) उंबरणेवाडी, १३) पिरकडवाडी

क) सुधागड तालुका:- १) कळंब ठाकूरवाडी, २) कोंडगाव ठाकूरवाडी, ३) करंजाई ठाकूरवाडी, ४) चिंबोड धनगरवाडी, ५) केळगण (केळगायणी) ठाकुरवाडी, ६) राबगाव (उंबरवाडी), ७) राबगाव (गावठेवाडी), ८) वारगवणे ठाकूरवाडी, ९) नांदुरकी ठाकूरवाडी, १०) उंबराचा माळ ठाकूरवाडी, ११) गडढवणे ठाकूरवाडी, १२) चरफळ ठाकूरवाडी, १३) वाघजाईनगर (पिराचा माळ) पाली, धनगरवाडा (पाली)

ड) रोहा तालुका:- १) फणसवाडी मेढा, २) उनाठावाडी, ३) चेराठी, ४) वेताळवाडी सुकेळी, ५) खातेलीवाडी, ६) इंदरदेव, ७) कातळवाडी, ८) ढेपावाडी, ९) कावेचीवाडी, १०) काळकाई, १०) कागदावाडी, ११) वाघरानवाडी

ई) पनवेल तालुका:- १) धोदाणी, २) सतीचीवाड़ी, ३) चिंचवाड़ी, ४) माडभुवन (आपटा कोंबडटेकडी)

एखाद्या ठिकाणी दरड कोसळून भूस्खलन झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन व काही ठिकाणी या दरडग्रस्त नागरिकांना घरे बांधून देण्याची योजना सरकार करीत असले तरी रायगड जिल्ह्यातील यापूर्वीच 103 गावे दरड प्रवण क्षेत्रामध्ये आहेत, त्यातील नऊ गावे अति धोकादायक तर 11 गावे धोकादायक असून 83 गावे अल्प धोकादायक असल्याचे रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हशे यांनी 21 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीत ही माहिती उघड झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड मधील 49 गावे दरड प्रवण क्षेत्रात आहे. त्यातील 1 गाव अति धोकादायक आणि 6 गावे धोकादायक क्षेत्रात आहेत, तर रोहा तालुक्यातील 13 गाव दरड प्रवण क्षेत्रात आहे व 2 गावे धोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात म्हसळा तालुक्यातील 6गावे माणगाव तालुक्यातील 5 पनवेल तालुक्यातील 3 खालापूर व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी 3 गावे दरड प्रवण क्षेत्रामध्ये असून या दोन्ही ठिकाणी एक गाव अति धोकादायक क्षेत्रामध्ये मोडत आहे. तसेच सुधागड तालुक्यात तीन श्रीवर्धन तालुक्यात दोन तळा तालुक्यात एक गाव दरड प्रवण क्षेत्रामध्ये आहे.

अलिबाग पेण, मुरुड आणि उरण तालुक्यात एकही गाव असुरक्षित स्थळी नाही. एकंदरीत जिल्ह्यात 103 गावे दरड प्रवण क्षेत्रामध्ये असून वीस गावे धोकादायक असून नऊ गावे अति धोकादायक आहेत. यातील वीस गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे, तर उर्वरित 83 गावांची पाहणी सुरू असल्याचे रायगड जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रातील गावांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे 5 तालुक्यातील 61 आदिवासी धोकादायक स्थितीत असल्याने त्यांचीही पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. आता राज्य शासन किती आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन व जिल्ह्यातील अति धोकादायक दरड प्रवण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यासाठी निधी देणार? याकडे आदिवासी यांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी हे सत्ताधारी पक्षात असल्याने आणि खरोखरच या दरडप्रवण क्षेत्रातील जनतेची त्यांना काळजी असेल तर राज्य शासनाकडून या दरडप्रवण क्षेत्रातील गावे व आदिवासी वाड्यांच्या पुनर्वसनासाठी निधीची तरतूद करतील, नाहीतर पावसाळा गेला की दिलेली आश्वासने पुन्हा पावसाच्या पाण्यात वाहून जातात की काय, असा प्रश्न या दरडप्रवण क्षेत्रातील आदिवासी वाड्यांसहित अनेक गावातील ग्रामस्थांना पडल्यास नवल वाटू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here