@NalavadeAnant

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर त्यांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा आहे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

देशभरात भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात इंडिया नावाने आघाडी स्थापन झालेली असताना या आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे की नाही हा प्रश्न चर्चिला जात आहे. यावर बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ज्या व्यक्तीमुळे देशाची लोकशाही, संविधान, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला धोका पोहचलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थित राहू नये, अशी लोकांची इच्छा आहे. परंतु शरद पवार हे कार्यक्रमाला जातच आहेत तर ज्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आपले गुरु आहेत, त्यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले होते, आता त्याच पुण्यात एका कार्यक्रमात गुरु-शिष्य एकत्र येतच आहेत तर, नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते लोकमान्य टिळकांच्या विचारसणीच्या विरोधात आहे, अशी कानउघाडणी गुरु शरद पवार यांनी शिष्य नरेंद्र मोदी यांची करावी, ही आमची अपेक्षा आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here