Twitter : @maharashtracity

मुंबई

नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी आज येथे दिले.  

सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. 

प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

सर्जनशील आणि सांस्कृतिक, उद्योगक्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा, असे राज्यपालांनी सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले. न्यूयॉर्क येथील ‘मेट गाला’ फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचा देखील कलाविषयक ‘मेट कला’ महोत्सव असावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. 

राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे (vacant of posts of art teachers) भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू असेही राज्यपालांनी सांगितले. 

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल असे सांगताना आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीनसारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती व मूर्ती घरोघरी पाठवतील असा इशारा राज्यपालांनी दिला. 

आपण स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कुलला (Sir J J School of Art) भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, विजय ना कदम, मनोहर साळवी, सतिश भोसले, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, अब्बास अतार, प्रकाश बाडकर, दिलिप ल सावंत, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, जे जी स्कुलमधील प्रा राहुल मेश्राम, दीपक वर्मा, सौ निता चौधरी, सौ राधिका कुसुरकर-वाघ आदींनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here