महापालिकेचे सर्वेक्षण
मुंबईसाठी समाधानकारक बाब
मात्र तरीही मुलांची काळजी घ्यावीच लागणार

@maharashtracity

मुंबई: मुंबईत महापालिका आरोग्य विभागाने मुंबईतील लहान मुलांचे रक्त नमुने विषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण केले असता ५० टक्केपेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड – १९ प्रतिपिंड विकसीत झाल्याचे आढळले आहे. या ५०% पेक्षाही जास्त मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका कमी होणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येणार. डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढणार. त्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र, विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत प्रतिपिंड असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असून ही बाब समाधानकारक व आनंददायी आहे, असे काकाणी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, तरीही गाफील राहून चालणार नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य धोका पाहता पालिकेने आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. तसेच, पालकांनीही आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच , कोरोनाबाबतच्या कडक नियमांचे म्हणजे त्रिसूत्रीचे पालन करायला पाहिजे, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कोविड – १९ विषाणू संसर्गाची तिसरी
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना आणि बालकांना देखील कोविड – १९ विषाणूचा धोका पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेता, कोविडच्या दुसऱया लाटेदरम्यानच लहान मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते.

त्यानुसार, पालिकेने १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ० ते १८ वयोगटातील २१७६ लहान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण २४ वार्डात केले. प्रत्येक वार्डात १०० मुलांचे सर्व्हेक्षण केले होते.

त्यानुसार, मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. पैकी, महापालिकेच्या प्रयोगशाळातील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत.

यामध्ये, १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. १ ते ४ गटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी या संपूर्ण वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते.

यापूर्वी मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये १८ वयापेक्षा कमी असलेल्या वयोगटात आढळलेल्या प्रतिपिंडांचा विचार केल्यास सुमारे ३९.०४ टक्के इतक्या मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. त्या तुलनेत आता प्रतिपिंडे असलेल्या मुलांची संख्या, टक्केवारी वाढली आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, दुसऱ्या लाटे दरम्यानच १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुले, बालके कोविड – १९ विषाणूच्या सान्निध्यात आली होती, असे काकाणी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here