Twitter : @Rav2Sachin
मुंबई
जेजूरी जवळील एका खेड्यात शाळेत नोकरी करणारे कला शिक्षक व निसर्ग चित्रकार दत्तात्रय शिंदे यांच्या पेंटिंगचे दुसरे एकल प्रदर्शन दिनांक 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरत आहे. या प्रदर्शनामध्ये त्यांनी जलरंग व अक्रॅलीक या माध्यमामध्ये रंगविलेली निसर्गचित्र प्रदर्शित केली आहेत.
महाराष्ट्राला चित्रकलेची व चित्रकला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी चित्रकला या विषयाचे खूप महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जेथे शालेय स्थरावर चित्रकला विषय शिकविण्यासाठी प्रशिक्षित कला शिक्षक नेमण्याची शतकभराची परंपरा आहे. आज महाराष्ट्रातील शहरापासून ते गाव – खेड्यापर्यंत असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला विषयाचे अध्यापन करणारे चित्रकला शिक्षक अनेक अडचणींचा सामना करून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शिक्षण देत आहेत, त्यांच्यातील कलागुणांची जोपासना करत आहेत. या बरोबरच स्वतःची चित्रकला ही जोपासत आहेत. दत्तात्रय शिंदे हे असेच एक उत्कृष्ट कला शिक्षक व निसर्ग चित्रकार आहेत.
जेजुरीजवळील मातोश्री जिजाबाई विद्यालयामध्ये ते कला शिक्षक असून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. पुरंदर तालुक्यातील मावडीकडे पठार या खेडेगावात त्यांचा जन्म व शालेय शिक्षण झाले. दहावीनंतर चित्रकला शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारा डिप्लोमा करण्यासाठी त्यांनी ओतूरमधील शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालयात फौंडेशन या वर्गात प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिकत असताना आऊट डोअर स्टडीच्या निमित्ताने कॉलेज व्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी ओतूर, जुन्नर, माळशेज घाट, ओझर, लेण्याद्री या भागामध्ये निसर्ग चित्र रंगविण्यासाठी भरपूर भटकंती केली.
प्रा विश्वनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनामुळे याच काळामध्ये दत्ता शिंदे यांना निसर्गचित्राची आवड लागली, व ते सातत्याने निसर्ग चित्र रंगवू लागले. पुढे त्यांनी अभिनव कॉलेज, पुणे येथून कालाशिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी पुणे विद्यापीठ, पर्वती, सिंहगड किल्ला तसेच मंडई, कसबा पेठ परिसराची दृश्य जलरंग माध्यमामध्ये रंगविली. तसेच अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला व पुरस्कार ही मिळविले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेजुरीजवळील साकुर्डे या गावातील मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालयात ते चित्रकला शिक्षकाची नोकरी करू लागले. सुरुवातीला कमी पगार मिळत असल्यामुळे चार-पाच वर्षे चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचीही अडचण येत होती. परंतु, चित्रकलेची साधना सातत्याने सुरू होती. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सासवड, पुणे, कोलकाता, मुंबई अशा विविध ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.
दत्तात्रय शिंदे यांच्या पेंटिंगचे हे दुसरे एकल प्रदर्शन या प्रसिद्ध गॅलरीमध्ये भरत आहे. या प्रदर्शनामध्ये त्यांनी जलरंग व अक्रॅलीक या माध्यमामध्ये रंगविलेली निसर्गचित्र प्रदर्शित केली आहेत. त्यामध्ये जेजुरी गडावरील सोमवती यात्रेतील भाविकांची गर्दी, तेथील भंडाऱ्याची उधळण केलेली चित्र असून वारी तसेच गणपती विसर्जन मिरवणूक असे विषय असलेले चित्र यात आहेत. त्याचबरोबर गावातील घरे, डोंगर, माळरान तसेच जलाशय व झाडांबद्दलची अनुभूती त्यांनी कॅनव्हासवर सुंदर पद्धतीने चित्रित केली आहे. निसर्गाचा सुंदर अनुभव देणारं हे प्रदर्शन दिनांक 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.