@maharashtracity

मुंबई: ज्या बीडीडी चाळींनी संयुक्त महाराष्ट्राचा चळवळ बघितली आहे, क्रांतीच्या ठिणग्या जन्माला घातल्या आहेत, त्या ऐतिहासिक चाळींच्या पुनर्विकासाचे (BDD Chawl redevelopment) भूमीपूजन माझ्या हस्ते व्हावे हा माझा गौरव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला शुभारंभ झाला. गेली अनेक वर्षे यावर केवळ चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास (SRA), बीडीडी चाळ आणि म्हाडा (Mhada) या तिन्ही क्षेत्रात रखडलेल्या कामांना गती दिली आहे. त्यामुळेच आज बीडीडी चाळीचे भाग्य उजळले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात. मी मुख्यमंत्री होईल असे कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. पण, आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतोय, याचा मला खूप आनंद आहे.”

ते म्हणाले, येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय.

बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहेे. या चाळीनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली. महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु ल देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली.

“माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले. मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो. त्यामुळे चाळीतले जीवन मला माहितीये,” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.”

उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात. हे घर तुमचे स्वतःचे आहे. त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी चाळकऱ्यांना केले.

ठाकरे पुढे म्हणाले, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये लोकांना हक्काचे घर आहे की नाही, ही खंत कोणी व्यक्त करायची? आज आम्ही हे आव्हान स्वीकारले असून या स्वराज्यात स्वतःचं हक्काचं घर आम्ही देत आहोत.”

गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत सन १९२० मध्ये तत्कालीन ब्रिटिश (British) सरकारने कैद्यासाठी बांधलेले बराक म्हणजे बीडीडी चाळ. अशा १२1 चाळी असून प्रत्येक चाळीत ८० घरे आहेत. असे एकूण ९६८९ कुटुंब या चाळीत राहतात.