@maharashtracity

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी आतापर्यंतच्या दोन्ही लाटेमध्ये चांगले सहकार्य केले आहे. त्याचपद्धतीने सहकार्य करून कोरोनाविषयक सर्व नियम पाळून आपण गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करूया, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी समस्त मुंबईकरांना केले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी पालिका मुख्यालय येथे महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर पेडणेकर यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.

या बैठकीला, उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समितीचे अध्‍यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्‍या अध्‍यक्षा संध्या दोशी, नगरसेवक / नगरसेविका, अतिरिक्‍त आयुक्त सुरेश काकाणी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर, प्रमुख कार्यवाहक गिरीश वालावलकर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे) सचिव डॉ.विनोद घोसाळकर, बृहन्‍मुंबई गणेश मुर्तिकार संघाचे अध्‍यक्ष गजानन तोंडवळकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उप आयुक्त हर्षद काळे, सर्व परिमंडळीय उप आयुक्त, संबंधित सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख व पालिका अधिकारी तसेच मुंबई पोलिस, वाहतूक पोलिसचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

गणेश मंडळांना परवानगी द्या , खड्डे बुजवा

गणेश मंडळाचा महापालिकेसोबत (BMC) असलेला सुसंवाद अधिक चांगला करण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळेत विभाग कार्यालयात उपस्थित राहून गणेश मंडळांच्या परवानगीचे सर्व कामे पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आदेश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. तसेच, गणेश मंडळांनीही मंडपासाठी खोदण्यात येणारे सर्व खड्डे बुजवावेत, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली.

महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय ठेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेऊन श्रीगणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन व्‍यवस्थित व्‍हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. तसेच धोकादायक उड्डाणपुलांवरुन ये-जा होणाऱया श्रीगणेशमूर्तींबाबत कोणत्‍याही दुर्घटना होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्‍याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

त्यासोबतच डेंगू, मलेरियाची साथ लक्षात घेता प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूर फवारणी करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. नरेश दहिबांवकर, तोंडवळकर, बाळासाहेब कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांनी गणेशोत्सव मंडळांना परवानगी देणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी कामात पालिकेने पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here