@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) उद्यान विभागाने झाडांच्या बुंध्याला कीड वा बुरशीपासून संरक्षण मिळावे, यासाठी गेरु व चुन्याचे लेपन करण्याची कार्यपद्धती अवलंबून काही झाडांचे जीव वाचावले आहेत. या यशस्वी कार्यपद्धतीची दखल इंग्लंडमधील (England) ‘एआरबी’ या त्रैमासिकाने घेतली आहे.
या अंकात महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांचा झाडांना केल्या जाणाऱ्या गेरू व चुन्याच्या लेपनासंबंधी एक विशेष व संशोधनपर लेख प्रकाशित झाला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी उद्यान विभागाचे व अभिनंदन व अधिक्षक जितेंद्र परदेशी यांचे पत्र पाठवून विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची, उद्यान खात्याची आणि अधिक्षक जितेंद्र परदेशी यांचीही ‘कॉलर ताट’ झाली आहे.
मुंबई शहर, उपनगरे येथील ७०० उद्यानांसह लाखो वृक्षांची सुयोग्य काळजी उद्यान विभागाकडून घेण्यात येते. झाडांना कीड, बुरशी वा जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये; यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे झाडांच्या बुंध्यांना गेरू व चुन्याचे लेपन नियमितपणे केले जाते.
या पारंपरिक व यशस्वी कार्यपद्धतीची, उपक्रमाची दखल आता इंग्लंड देशातून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘एआरबी’ या त्रैमासिकाने घेतली आहे.
यापूर्वी देखील मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह यांनी मुंबई परिसरातील वृक्षांच्या खोडांना तांबड्या व पांढ-या रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन देण्यामागची माहिती जाणून घेतली होती. ज्यानंतर त्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मलेशियातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.