Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबईतील रुग्णालयांमध्ये अग्नीशमन यंत्रणेत काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी निधी आवश्यक आहे. त्यासाठी आलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी देवून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तर तासात विधानसभेत दिले. सर जे. जे. रुग्णालयासाठी ५६ कोटी रुपये दिले जातील असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य सुनिल राऊत यांनी रुग्णालयांमधील अग्नीशमन यंत्रणाच व्हेंटीलेटरवर आहे. अनेक रुग्णालयांमध्ये अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नाही आणि जिथे कार्यरत आहे त्यात त्रुटी आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रश्न विचारताना दिला. 

मुंबईतील सर जे. जे., केईएम, शीव, नायर रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुरेशी अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने केलेल्या फायर ऑडिटमध्ये दिसून आले. काही ठिकाणी यंत्रणा कालबाह्य असल्याचे नमूद केले होते. याकडे लक्ष वेधताना अशी रुग्णालये कोणती, अग्नीसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरुध्द काय कारवाई केली असे प्रश्न सुनील राऊत यांनी यावेळी उपस्थित केले. अशा रुग्णालयांचे फायर ऑडिट कधी होणार, अद्ययावत अग्नीशमन यंत्रणा कधी देणार, पुरेसा निधी कधी उपलब्ध करणार, तसेच तेथील कर्मचाऱ्यांना अग्नीशमन प्रशिक्षण देण्यास काय उपाययोजना केली, असे उपप्रश्नही राऊत यांनी उपस्थित केले.

उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले आहे. शीव रुग्णालयात १ कोटी, केईएममध्ये २ कोटी ७५ लाख, नायर रुग्णालयात ५० लाख रुपये, कूपर रुग्णालयात ४० लाख तर १६ उपनगरीय रुग्णालयांचे फायर ऑडिटसाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले. मुंबई शहरात सरकारी व खासगी अशा १५१७ रुग्णालयांपैकी ६६३ रुग्णालयांना अंमलबजावणीची नोटीस देण्यात आली आहे. येत्या ९० दिवसांत या सर्व रुग्णालयांची पुन्हा पाहणी केली जाईल, असे सामंत म्हणाले.

कॉंग्रेस सदस्य अमित देशमुख, भाजपचे अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, अजय चौधरी यांनीही उपप्रश्न विचारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here