@maharashtracity

मुंबई: मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाळ्यातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता कमी असल्याने (समुद्रात पाणी वाहून नेण्याची क्षमता) अतिवृष्टी झाल्यास काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असे अजब वक्तव्य पालिका आयुक्त (BMC Commissioner) इकबाल सिंग चहल (IS Chahal) यांनी केले आहे.

मुंबईत हिंदमाता, सायन सर्कल, किंग्जसर्कल या सखल भागात पाणी साचल्याने आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयुक्त यांनी पालिका आपत्कालिन विभागाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पत्रकारांशी आयुक्त म्हणाले की, गेल्या १२ तासात मुंबईत १४० मिमी ते १६० मिमी इतका पाऊस पडला आहे. जर २४ तासात ५०० मिमी इतका पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात. मात्र एका तासातच १०० मिमी पेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काही तास लागणारच.

भूमीगत पाणी टाक्या प्रकल्प महत्वाचा

हिंदमाता येथे पाणी साचू नये यासाठी पालिकेने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या असून काम प्रगतीपथावर आहे. हिंदमाता येथे साचणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी पालिका भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधत असून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून पुढे त्याचा नीटपणे निचरा करण्यात येणार आहे.

रु १४० कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू असून दीड किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण व्हायला ३० दिवस लागणार आहेत. त्यानंतर मात्र भविष्यात हिंदमाता येथे पावसाचे पाणी कधीच साचणार नाही, असा दावा आयुक्तांनी केला.

पालिकेने हिंदमाता परिसरात केलेल्या विविध उपाययोजननांमुळे यंदा जरी हिंदमाताच्या ठिकाणी काही प्रमाणात आणि साचले असले तरी गेल्या १५ वर्षात प्रथमच वाहतूक थांबली नाही. मे अखेरीस केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे.

तसेच, सायन गांधी मार्केट येथे मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले असून त्यामुळे यापुढे गांधी मार्केटच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा दावाही आयुक्तांनी केला.

त्याचप्रमामे, मोगरा पंपींग स्टेेशनचे काम पूर्ण झाल्यावर अंधेरी सब वे मध्ये पाणी सचण्याचा प्रकार बंद होईल, असेही त्यांनी सांगितले. दहिसर, सायन आणि चुनाभट्टी वगळता रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबलेले नाही, असे आयुक्तांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here